लातूर : बनावट वेबसाईटद्वारे राज्याच्या आरोग्य विभागात नोकरीसाठी मेगा भरती आयोजित करत राज्यभरातून हजारो तरुणांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे. लातूर एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या  नोकरीसाठीच्या मुलाखती थेट पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये पार पडल्या आहेत. याची यादीदेखील ससूनच्या नोटीस बोर्डावर लावली होती.

राज्यातील नोकर भरतीचा स्पेशल 26 ड्रामा समोर आला असून जितेंद्र भोसले या मुंबईतील आरोपीला या प्रकरणी अटक केले आहे. तो सध्या लातूर पोलिसांच्या ताब्यात आहे.

जितेंद्र भोसले याने आरोग्य विभागाची बनावट वेबसाईट तयार करून 956 जागांची भरती आयोजित केली होती. यात वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, सुरक्षा रक्षक आणि सेवक पदाची भरती करण्यात येणार असल्याचे दाखवले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जितेंद्र जात होता. वेबसाईटवर यादी दाखवून नोकरी लावतो असे सांगून सात ते दहा लाखांपर्यंत पैसे घेत होता.

आरोपी जितेंद्र भोसले

त्याने लातूर, परभणी आणि मुंबईत जितेंद्रने अनेक लोकांकडून पैसे घेतले आहेत. केवळ लातूर जिल्ह्यातूनच तीस पेक्षा जास्त लोकांकडून पैसे घेतले असावेत अशी माहिती आहे. पोलिसांनी तात्काळ ही बोगस वेबसाईट बंद केली आहे.

सावजांना हेरताना लवाजमा, गाड्यांवर महाराष्ट्र शासनाचा बोर्ड 
जितेंद्र भोसले याचा मुंबईत बीअरबार असल्याची माहिती आहे. हा आपल्या सावजांना हेरताना पॉश गाड्या घेऊन येत होता. गाड्यांवर महाराष्ट्र शासनाचा बोर्ड देखील लावायचा. तसेच सोबतीला पीए, सुरक्षा रक्षक असा लवाजमा देखील असायचा. शहरातील सर्वात महागड्या हॉटेलमध्ये तो उतरत असे. यामुळे सावज आपोआप त्याच्या जाळ्यात सापडायचे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी जितेंद्र ससून हॉस्पिटलमध्ये नवीन उमेदवाराच्या मुलाखती घ्यायचा. असेच प्रकार त्याने परभणी, गंगाखेड आणि मुंबईच्या ग्रामीण भागात देखील केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात जितेंद्रला मदत करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.