पुणे : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता संपली आहे. 16 जुलैला दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. पण बारावीसोबतच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.


दरवर्षी निकाल लागल्यावर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मुल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्र यासाठीचे अर्ज देण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वत: मंडळात जावं लागत होतं किंवा शाळा, महाविद्यालयांच्या मार्फत मंडळात अर्ज द्यावे लागत होते. मंडळात अर्ज देणं गरजेचं होते. पण यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शाळा, महाविद्यालयं आणि विभागीय मंडळामध्ये गर्दी होऊ नये यासाठी ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन केली जाणार आहे. निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ही आॅनलाईन प्रक्रिया सुरु होईल.


दहावीचे विद्यार्थी
http://verification.mh-ssc.ac.in


आणि बारावीचे विद्यार्थी
http://verification.mh-hsc.ac.in


या वेबसाईटवरुन अर्ज करु शकतील. या अर्जासाठी लागणारी फी सुद्धा आॅनलाईन भरावी लागेल. 16 जुलैला बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर 17 जुलैपासून बारावीचे विद्यार्थी या वेबसाईटवरुन अर्ज दाखल करु शकणार आहेत.


बारावीचा निकाल खाली नमुद केलेल्या वेबसाईटवर दिसेल.


www.mahresult.nic.in/
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com


बारावीच्या सर्वच शाखांची परिक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च यादरम्यान पार पडली. लाॅकडाऊनच्या आधी बारवीची परिक्षा जरी संपली होती. मागच्या वर्षी 28 मेला बारावीचा निकाल जाहिर करण्यात आला होता. पण यावर्षी लाॅकडाऊनमुळे बारावीचा निकाल लागण्याला उशीर झाला आहे.


यावर्षी बारावीच्या परिक्षेसाठी एकुण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकुण 9923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आणि पुर्ण राज्यातील जवळपास 3036 परिक्षा केंद्रांवरुन ही बारावीची परिक्षा घेण्यात आली. यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे होते. विज्ञान शाखेचे 5 लाख 85 हजार 736, कला शाखेचे 4 लाख 75 हजार 134, तर वाणिज्य शाखेचे 3 लाख 86 हजार 784 विद्यार्थी आहेत. व्यावसायीक अभ्यासक्रामाचे 57 हजार 373 विद्यार्थी आहेत.


संबंधित बातम्या :




बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत : वर्षा गायकवाड