मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज जवळपास सर्वच पक्षांनी आपआपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. अर्ज भरताना महाविकास आघाडीत पुन्हा एकदा नाराजी दिसून आली. तर जवळपास सर्वच पक्षांसमोर बंडोखोरांचे आव्हान कायम असल्याचे दिसून आले आहे.
विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण लाड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला तर शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसच्या जयंत आससगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीचे नेते पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सतेज पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील नेते यावेळी उपस्थित होते.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी अनेक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची विभागीय आयुक्त कार्यालयात गर्दी उसळली होती. भारतीय जनता पक्षाकडून पदवीधर मतदारसंघातून काल सांगलीच्या संग्राम देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील सांगली जिल्ह्यातीलच अरुण लाड यांना मैदानात उतरवण्यात आलंय. तर काँग्रेसचे उमेदवार जयंत आजगावकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेकडून देखील आज पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्यात आला.
भाजपकडून आपल्याला महत्त्व दिले जात नसल्याने आपण उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्याला उमेदवारी मिळेल असा दावा करीत काल अनेकांनी त्यांचा निवडणूक अर्ज दाखल केला होता. मात्र, या अर्ज दाखल करणाऱ्या बंडखोरांना अर्ज मागे घेण्यास सांगण्यात येईल आणि त्यांची बंडखोरी निवळेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय. काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार फार काळ चालणार नाही असं म्हटलं होतं त्याला उत्तर देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत बाळासाहेब थोरात यांनी चंद्रकांत पाटील यांनी इथून पुढची चार वर्ष अशाच प्रकारची स्वप्ने पाहावीत असा टोला लगावलाय.
अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी वंचित बहूजन आघाडीची चाचपणी. महाआघाडीकडून सध्याचे आमदार श्रीकांत देशपांडेंना पाठिंबा.
विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज नागपूरचे महापौर संदीप जोशी ह्यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने ह्यावेळी शक्तिप्रदर्शन करत एका पद्धतीने निवडणुकीच्या प्रचारकचा शंखही वाजवला असे ही म्हणता येईल.
अर्ज दाखल करण्यासाठी संदीप जोशींबरोबर नागपुरातील सर्व आमदार तर होतेच, पण माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ह्या जागेसाठी मतदान करणाऱ्या पूर्व विदर्भाच्या इतर जिल्ह्यातील खासदार आणि आमदारही उपस्थित होते. तसेच कार्यकर्तेही मोठ्या संख्येत संविधान चौकात एकत्र झाले होते. संदीप जोशी ह्यांनी पक्षाचे नेते आणि ज्यांनी ही जागा अनेक टर्म राखली अश्या नितीन गडकरींच्या घरी जाऊन आशीर्वाद घेतला. नंतर संविधान चौकात डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून फॉर्म भरायला आगेकूच केली. ह्यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवारांनी महाविकास आघाडीवर मुंबईत होणाऱ्या अधिवेशनापासून तर खावटीची खोटी घोषणा केली असे म्हणत जोरदार टीकास्त्र झाडले.
ह्या जागेवर नुकतीच भाजपची टर्म प्राध्यापक अनिल सोले ह्यांनी पूर्ण केली होती आणि ते ही उमेदवारीच्या रेसमध्ये होते. ते जेव्हा इतर नेत्यांबरोबर पोहचले नाही तेव्हा ते नाराज असल्याची चर्चा सुरू होती. पण शेवटच्या क्षणी जोशी फॉर्म भरत असताना ते पोहचले आणि भाजपच्याही अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना हुश्श झाले.
आघाडीत बंडखोरांचे आव्हान
विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज काँग्रेस पक्षाचे अभिजित वंजारी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. अभिजित वंजारी हे महाविकास आघाडीचे सर्वमान्य उमेदवार असल्याचा दावा यावेळी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला. मात्र, त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची तसेच नागपूर शहरातील स्थानिक नेत्यांची अनुपस्थिती खटकणारी होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून फक्त माजी मंत्री रमेश बंग अखेरच्या क्षणी उपस्थित झाले होते. तर शिवसेनेकडून रामटेकचे खासदार कृपाल तुमाने अर्ज दाखल करताना उपस्थित होते. आघाडीमध्ये कोणतेही बेबनाव नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते या ठिकाणी उपस्थित नसले. तरी राष्ट्रवादीचे माजी मंत्री रमेश बंग उपस्थित असल्याचा दाखला देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आम्ही बसून गुंता सोडवू असे सूचक वक्तव्य केले.
तर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या अनुपस्थितीला फारसं महत्व न देता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत. त्यांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी निश्चितच निवडणूक जिंकतील असा दावा केला. आम्ही सर्व मंत्री विदर्भात तळ ठोकून राहू, पूर्ण जोर लावू आणि भाजपला पराभूत करू. पदवीधर मतदारसंघ भाजपचा गड आहे हे समज दूर करू असा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला.
आज सकाळी दहा वाजता सुमारे 300 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांनी जीपीओ चौकातून हाकेच्या अंतरावर असलेल्या विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत एक छोटी रॅली काढली. काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांच्या उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केला. यंदा न्यायालयाच्या निर्देशानुसार पदवीधर मतदारसंघाची जुनी मतदार यादी रद्द ठरून नवी मतदार यादी तयार करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने नव्या मतदार यादीत तरुणांच्या नोंदणीसाठी सुरुवातीपासून लक्ष घातले आहे. त्यामुळे यावेळेला भाजपचा गड मानला जाणारा नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ काँग्रेस जिंकेल असा दावाही बहुतांशी काँग्रेस नेत्यांनी केला. दरम्यान, अभिजित वंजारी यांची रॅली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या घरासमोरून निघूनही त्यात नागूपर शहरातला राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नेता सहभागी न झाल्याने या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.