मुंबई: पुण्यातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवल्यानंतर, त्याबाबत राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत.

पालकमंत्री गिरीष बापट

"राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्याची घटना निंदनीय आहे.


याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत",


- पालकमंत्री गिरीष बापट


पुतळा पुन्हा उभा करु : पुण्याचे महापौर

पुणेकरांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ज्या शक्तींमार्फत केला जातोय, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे केली आहे, असं पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितलं.

"राम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा उभा करु.


मतांचं राजकारण करायचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही"


- प्रशांत जगताप (महापौर, पुणे)


विनायक मेटे

राम गणेश गडकरी याचं योगदान मोठं आहे. अशा पद्धतींने पुतळ्याची नासधूस करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसं नाही, आम्ही कृतीचा निषेध करतो, असं शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.

राम गणेश गडकरी यांनी नाटकातून संभाजी महाराजांचा अवमान केला की नाही या लिखाणावर आक्षेप असेल तर तो वेगळा विषय असू शकतो.

"मराठा समाज सर्व समाजाचं पालकत्व घेणारा समाज आहे.


त्यामुळे शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांच्या नावानं असं करणं,


हे त्यांना लहान केल्यासारखं आहे",


शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे


 

श्रीपाल सबनीस, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष

राम गडकरींची कृती चूक आणि त्याचा प्रतिवादही चूक. तुम्हाला लेखन आक्षेपार्ह वाटतं तर त्याचा प्रतिवाद व्याख्यानं,लेखन, विचाराच्या मार्गानं करा. पुतळे फोडून नव्हे, असं माजी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस म्हणाले.


"संभाजी महाराज जसे होते, तसे त्यांच्याविरुद्ध त्यांचं चित्रण अनेक


साहित्यिक, नाटककार, बखरकारांनी केलं.


इतिहास पुन्हा आणि अचूक लिहिला जाण्याची गरज आहे".


- श्रीपाल सबनीस


नितेश राणे, आमदार काँग्रेस

"संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्यात


संभाजी ब्रिगेडचा काहीही संबंध नाही.


ज्या मर्द मराठ्यांनी केलं त्यांना सलाम !!" - नितेश राणे, आमदार काँग्रेस


पुण्यातील पुतळा हटवला

नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुण्याच्या संभाजी उद्यानातील पुतळा हटवण्यात आला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा हटवला आहे. मात्र गडकरींचा पुतळा हटवण्यात संभाजी ब्रिगेडचा काहीही संबंध नसल्याचा दावा काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

‘राजसंन्यास’ या नाटकातून राम गणेश गडकरींनी  छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. यातील मजकूर खटकल्याने संभाजी ब्रिगेडच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांनी रात्री अडीचच्या सुमारास पुतळा हटवला आणि शेजारुन वाहणाऱ्या मुठा नदीत पुतळा फेकून दिल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान चार कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे आणि त्याआधारेच आता पोलिस तपास करत आहेत. पण पुतळ्याचा शोध अद्याप लागलेला नाही.

संबंधित बातमी

नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडने हटवला!