'पीएमसी' बँकेतील 4 हजार 300 कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाल्यानंतर बँकेकडून हे निर्बंध लादण्यात आले होते. त्यानंतर खातेदारांना एटीएमने पैसे काढता येत नव्हते. घोटाळा उघडकीस आल्यानंतर आरबीआयने पहिल्यांदाच खातेदारांना एटीएम वापरण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे आता खातेदारांना एटीएमने पैसे काढण्यात येणार आहे. खातेदारांनी बँकेकडून लादण्यात आलेल्या या जाचक अटीनंतर संतप्त झालेल्या खातेदारांनी बँकेच्याविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर बँकेकडून पैसे काढण्याची रक्कम वाढविण्यात आली आहे. पीएमसी बँकेचे सुमारे 17 लाख खातेदार आहेत, तर बँकेवर 11 हजार 500 कोटी रुपयांचं आर्थिक संकट आहे. बँकेत अनेकांची लाखो रुपयांची एफडी, सॅलरी अकाऊंट आहेत.
पीएमसी घोटाळाप्रकरणी बँकेच्या खातेदारांनी पैसे परत मिळण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. बँकेच्या खातेधारकांच्या हिताचे रक्षण केले जाईल असा विश्वास आरबीआयच्या गव्हर्नरांनी आपल्याला दिल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तसेच या प्रकरणाचा लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे.
पैसे काढण्याची मर्यादा किती वेळा वाढवली?
सर्वात आधी आरबीआयने पैसे काढण्याची मर्यादा केवळ 1000 रुपये निश्चित केली होती. त्यानंतर ती वाढवून 10,000 रुपये करण्यात आली होती. मग आरबीआयने 3 ऑक्टोबर रोजी बँक ग्राहकांना आपल्या खात्यातील जमा रकमेपैकी 25,000 हजार रुपये काढण्याची परवानगी दिली. यानंतर खातेदारांनी जोरदार गोंधळ घालत निषेध व्यक्त केल्याने आरबीआयने पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आणि ती 40 हजार रुपये केली.
खातेदारांचा पैसा सुरक्षित : आरबीआय
दरम्यान, बँकेच्या खातेदारांचा पैसा सुरक्षित आहे. 30 ऑक्टोबरला घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत खातेदारांना निर्णयाची माहिती देण्यात येईल, असं आरबीआयने सांगितलं. यानंतर मुंबईतल्या आझाद मैदानात सुरु असलेलं पीएमसी खातेदारांचं आंदोलन स्थगित करण्यात आलं.