Rayat Kranti Sanghatana : रयत क्रांती संघटनेची (Rayat Kranti Sanghatana) राज्यव्यापी कार्यकारणी संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत  (Sadabhau Khot) यांच्या नेतृत्वाखाली आज (25 ऑगस्ट) पुणे येथे पार पडली. या बैठकीत विविध विषयांवरील महत्वाचे ठराव करण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसह सोयाबीन (soybean) आणि कापसाच्या (cotton) हमीभावाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. जाणून घेऊयात ठरावाबद्दल सविस्तर माहिती. 


रयत क्रांती संघटनेची राज्यव्यापी कार्यकारणी संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे येथे पार पडली. या बैठकीस राज्यभरातील विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सध्या रयत क्रांती संघटनेच्या आणि पक्षाच्या सर्व आघाड्या बरखास्त करण्यात आलेल्या असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आमदार सदाभाऊ खोत आणि प्रमुख पदाधिकारी यांचा राज्यव्यापी दौरा आयोजित करण्यात आलेला असून दौऱ्या दरम्यान तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांच्या निवडी करण्यात येणार आहेत आणि त्यानंतर मुंबई येथे होणारे महामेळाव्यात "प्रदेशाध्यक्ष" पदाची नेमणूक करण्यात येईल, असे बैठकीत ठरवण्यात आले. दरम्यान, आजच्या बैठकीत महत्वाचे ठराव करण्यात आले आहेत. 


बैठकीत झालेले महत्त्वाचे ठराव 



  •  शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी. 

  •  साखरेचा हमीभाव 38 रुपये करण्यात यावा.

  •  शासनाकडून सोयाबीनला उप्तादन खर्चावर आधारित ७ हजार आणि कापसाला १० हजार हमीभाव देण्यात यावा.

  •  सन २०२३-२४ चा पिक विमा देण्यात यावा.

  •  वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानातून तार कुंपण द्यावे.

  •  महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून (MREGS) शेतीची कामे घेण्यात यावीत.

  •  शेतकऱ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेकडून तपासण्यात येणारे सिबिल (कर्ज पात्रता) रद्द करण्यात यावे.

  •  कांद्यावरील निर्यात शुल्क काढण्यात यावे. 

  •  शेतमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठावण्यात यावी. 

  •  आवश्यकता नसताना शेतमाल आयात करू नये.

  •  रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक शेतकऱ्यांना कांदाचाळ अनुदान देण्यात यावे.

  • शेतात लागणारी शेती अवजारे, बी बियाणे, खत यावर लागणारी GST माफ करण्यात यावी.

  • निलंगा, जि. लातूर / माढा जि. सोलापूर / खेड आळंदी जि. पुणे / वरुड मोर्शी जि. अमरावती / मेहकर जि. बुलढाणा / वाळवा जि. सांगली हे सहा मतदार संघ "रयत क्रांती पक्ष" मोठ्या ताकदीने लढवणार आहे.


दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर विचार मंथन करण्यासाठी भविष्यात कार्यकर्त्यांची "अभ्यास शिबिरे" देखील आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला आघाडीकडून कार्यकर्त्यांना राखी बांधून रक्षाबंधन देखील साजरा करण्यात आले. विधान परिषदेवर नुकतेच आमदार म्हणून निवडून गेल्याबद्दल सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटनेकडून भव्य नागरी सत्कार करण्यात आला.


महत्वाच्या बातम्या:


Agriculture News : दूध दरावरुन रयत क्रांती आक्रमक, आज दुग्ध विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक