पुणे : ट्रेनी आयएएस असताना स्वतःच्या ऑडी गाडीवर अंबर दिवा लावून चमकोगिरी केल्याप्रकरणी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) या चर्चेत आल्या आहेत. तसेच होम डिस्ट्रिक्टमध्ये ट्रेनी कार्यकाळ सुरू असताना त्यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे केबीनही बळकावली होती. आता पूजा खेडकरांची वाशिम (Washim) येथे बदली करण्यात आली आहे. यावरून काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी तोफ डागली आहे. 


गेल्या दोन दिवसांपासून पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचे उत्पन्न, श्रीमंत थाट ते त्या सनदी अधिकारी होण्यास कशाप्रकारे पात्र नव्हत्या, याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. पूजा खेडकर या महाराष्ट्र केडरच्या 2022 च्या बॅचमधील IAS अधिकारी आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुण्यात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. या काळात पूजा खेडकर या स्वत:च्या खासगी ऑडी गाडीवर लाल-निळा दिवा आणि महाराष्ट्र शासन अशी नेमप्लेट लावून फिरायच्या. याशिवाय, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावून पूजा खेडकर यांनी तिकडे स्वत:चे कार्यालय थाटले होते. आता पूजा खेडकर यांची वाशीममध्ये बदली करण्यात आली असून यावरून रवींद्र धंगेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


बदली होऊन काही होणार नाही, सस्पेंड केलं पाहिजे : रवींद्र धंगेकर 


रवींद्र धंगेकर म्हणाले की, हे असे आयएएस अधिकारी सिस्टीममधले कलंक आहेत. या अधिकाऱ्यांची बदली होऊन काही होणार नाही. त्यांना सस्पेंड केलं पाहिजे. या अधिकाऱ्यांच्या वडिलांनी तिचे बोगस सर्टिफिकेट बनवले. तिचे सर्टिफिकेट, मेडिकल सर्टिफिकेट या सगळ्याची तपासणी व्हायला हवी.  घरातूनच तिला असे संस्कार मिळाले आणि त्यामुळे तिची वर्तणूक सुद्धा तशीच दिसत आहे.  सिस्टीममध्ये अशा एकच पूजा खेडकर नाहीत, इतरही आहेत. पण यांच्यावर कठोर कारवाई केली. तरच सिस्टीम योग्य दिशेने जाईल. एक प्रकारे मुजोरी करणारे हे अधिकारी आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. 


काय म्हणाल्या पूजा खेडकर ? 


आज पहिल्यांदाच पूजा खेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, मला सध्या काहीही बोलण्याची परवानगी नाही. मला वाशिममध्ये रुजू होताना आनंद होतोय, इथून पुढेही मला वाशिममध्ये काम करायला आवडेल. मला सरकारने काहीही बोलण्यासाठी परवानगी दिलेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Pooja Khedkar Video : "सगळ्यांना तुरुंगात टाकेन", ऑडी कारवर कारवाई करायला गेलेल्या पुणे पोलिसांना IAS पूजा खेडकरच्या आईची दमदाटी