मुंबई : मुख्यमंत्री बदलले तर भाजपचा पाठिंबा काढून घेऊ, असा निर्धार राज्यातल्या सहा अपक्ष आमदारांनी व्यक्त केला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलन चिघळत असल्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु आहे.


मुख्यमंत्री मराठा आरक्षण देण्यासाठी सक्षम आहेत, मात्र त्यांना पदावरुन दूर केलं तर आपण सरकारमध्ये राहणार नाही, असा इशारा अपक्ष आमदार रवी राणा यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचं रवी राणा म्हणाले. राणा यांच्यासोबत गणपतराव गायकवाड, शिरीष चौधरी, किशनराव जाधव, माधवराव फड या आमदारांनीही पाठिंबा काढण्याची भाषा केली आहे.

रवी राणा हे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातून अपक्ष आमदार आहेत.

देवेंद्र फडणवीसांचा खांदेपालट करण्याची चर्चा सुरु असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल केला होता. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी लॉबिंग सुरु झालं आहे.
भाजपात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु, संजय राऊतांचा दावा

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. यामुळे सरकार अस्थिर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र शिवसेना आणि भाजपकडे पुरेसं संख्याबळ असल्यामुळे सहा आमदारांनी पाठिंबा काढला तरीही सरकारला फारसा धोका उद्भवत नाही.
संबंधित बातम्या :

मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीच्याही आमदाराचा राजीनामा

मराठा आरक्षणासाठी सेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा