Ratnagiri Sindhudurg Heavy Rain News : राज्यातील वातावरणात हळूहळू बदल (Climate Change) होत आहे. राज्यातील बहुंताश भागात पाऊस (Rain) हजेरी लावत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ होत आहे. दरम्यान, आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, पुढील 2 ते 3 तास रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg)जिल्ह्यासाठी महत्वाचे आहेत. कारण पुढील 2 ते 3 तासात या दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशार हवामान विभागानं दिला आहे.
गोव्यासह कर्नाटक केरळमध्येही जोरदार पावसाचा इशारा
हवामान विभागानं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळं पुढील दोन ते तीन तास या दोन्ही जिल्ह्यासाठी महत्वाचे आहेत. तसेच गोव्यात देखील मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागामं दिला आहे. त्याचबरोबर कर्नाटक आणि उत्तर केरळ किनारपट्टीवर पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
आज कुठं पडणार पाऊस?
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. तसेच उत्तर कोकण, आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्य हवामान विभागानं वर्तवली आहे.
पावसामुळं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान
सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. कारण शेतकरी पावसाची वाट पाहत होते. अनेक भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकऱ्यांची कामं देखील रखडली होती. अखेर पावसाचं आगमन झाल्यानं शेतीकामांना वेग आला आहे. शेतकरी आता खरीपाच्या पेरणीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, पेरणीयोग्य पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी करु नये असा सल्ला कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या: