रत्नागिरी: शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात अर्थात रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस आता पुढे आली आहे. उत्तर रत्नागिरी अर्थात खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण या ठिकाणचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी थेट पालकमंत्री अनिल परब यांना हटवा अशी मागणी केली आहे. त्यांना केवळ झेंडावंदनला येण्यास वेळ आहे. पालकमंत्री म्हणून परब राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना झुकते माप देतात. निधी वाटपामध्ये देखील डावललं जातं अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी चिपळूण येथे पुष्कर ह़ॉलमध्ये पार पडलेल्या बैठकीत बोलून दाखवली. 


उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात देखील नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांच्या दौऱ्यावेळी सामंत यांनी कशा पद्धतीने चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात लोकसभेवेळी असलेलं 50 हजारांचं मताधिक्य राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेखर निकम यांनी तोडलं होतं. त्याबाबचा किस्सा सांगितला होता. तो व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. त्यामुळे सामंत यांच्याबाबत देखील नाराजी व्यक्त केली गेली. कारण याच चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून सदानंद चव्हाण केवळ 2 हजारांच्या मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळे सामंत यांच्या विधानाबाबत देखील नाराजी व्यक्त केली गेली. रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागातील पाच तालुक्यांमध्ये शिवसंपर्क अभियान राबवलं जाणार आहे. त्यासंदर्भात ही बैठक होती. या बैठकीला संपर्क प्रमुख सुधिर मोरे, शरद बोरकर हजर होते. त्यावेळी हि नाराजी सेना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. शिवाय आपलं म्हणणं 'मातोश्री' अर्थात उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवा अशी देखील मागणी केली. दरम्यान, या बैठकीमध्ये दापोली - खेडचे शिवसेना आमदार योगेश कदम यांच्या खांद्यावर शिवसंपर्क अभियानाची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती दिली गेली. मातोश्रीवरून तशा सुचना असल्याचं यावेळी संपर्क प्रमुखांनी सांगितल्याची माहिती देखील पदाधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर 'एबीपी माझा'ला दिली. 


कदम-परब वादची पार्श्वभूमी
अनिल परब यांच्या दापोलीतील मुरूड या ठिकाणी असलेल्या साई रिसॉर्टबाबत किरिट सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पण, याचबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते कर्वे आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिप समोर आल्या होत्या. त्यानंतर डिसेंबर 2021मध्ये दापोली आणि मंडणगडमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्यावेळी कदम पिता - पुत्रांना बाजुला केलं गेलं होतं. त्यामुळे देखील नाराजी होती. याचीच प्रचिती आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावेळी आली होती. दापोलीतील शिवसृष्टी उद्घाटनावरून वाद झाला आणि त्याचंच प्रतिबिंब आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी दिसलं होतं. कदम समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. शिवाय, योगेश कदम यांचं भाषण देखील आक्रमक असंच होतं. 


परबांना हटवणार? 
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अनिल परब हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे कदम यांच्या वादाची पार्श्वभूमी आणि कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी केलेली मागणी पाहता अनिल परब यांना पालकमंत्री पदावरून हटवलं जाणार का? असा देखील सवाल विचारला जात आहे. 


सामंत काय म्हणाले होते? 
24 एप्रिल रोजी अजित पवार चिपळूण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गोविंद निकम यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. त्यानंतर सर्वच नेत्यांची भाषण देखील झाली.नेत्यांनी मारलेल्या कोपरखळ्यांनी देखील यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आपल्या भाषणादरम्यान बोलताना उदय सामंत यांनी 'लोकसभेला आम्हाला 52 हजारांचं मताधिक्य होतं. आमचा फुगा मोठा होता. पण, त्यानंतर देखील चिपळूण - संगमेश्वर मतदारसंघातून शेखर निकम विजयी झाले. आमचे 50 हजारांचे लीड त्यांनी तोडले. त्याचा पॅटर्न केवळ त्यांना आणि मला माहित आहे. हा पॅटर्न महत्त्वाचा आहे. माझे आणि शेखर सरांचे काही कॉमन मित्र आहेत ते त्यांच्या मतदारसंघात त्यांना आणि माझ्या मतदारसंघात मला मदत करतात'. असं जाहीर विधान सामंत यांनी केलं आणि सर्वांच्या भुवया मात्र उंचावल्या. कारण याच मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार सदानंद कदम यांना 2 हजारांच्या मताधिक्यानं पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे साहजिकच उदय सामंत यांच्या या विधानाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. शिवाय, त्यांच्या त्या भाषणाचा व्हिडीओ देखील समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता.