रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील कथित दरोडा हा बनाव असल्याचं उघड झालं आहे. महामार्गावर झालेल्या बाचाबाचीतून हा बनाव रचल्याचं स्पष्ट झालं आहे.


 
गाडीतील पाच लाखांचा ऐवज आणि लॅपटॉपही चोरीला गेला नसल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे दरोड्याची फिर्याद देणाऱ्या मुंबईतील पाच तरुणांविरोधातच आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

 
मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांना लुटल्याची तक्रार मंगळवारी सकाळी देण्यात आली होती. हायवेवर रत्नागिरी संगमेश्वर दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप झाला होता.

 
काय होता आरोप?

मुंबईतून रत्नागिरीच्या दिशेने जाताना मुंबईतील झायलो गाडी मानसकोंड गावानजीक पंक्चर झाली. याच वेळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन गाड्यांतून आलेल्या 10 ते 15 जणांनी झायलो गाडीतील पाच जणांना बेदम मारहाण केल्याची तक्रार तरुणांनी केली.

 
गाडीच्या काचा फोडल्या आणि आपल्याकडील पाच लाख रुपयांची रोकड आणि लॅपटॉप पळवला. अवघ्या काही मिनिटातच ही लूट करुन हे दहा ते पंधरा जण दोन गाड्यातून निघून गेल्याचा दावा या पाच जणांनी केला होता. हे पाचही तरुण मच्छिमारी बोट खरेदी करण्यासाठी रत्नागिरीच्या दिशेने निघाले असताना हा सारा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं.

 
या घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. लुटलं गेल्याचा दावा करणाऱ्या पाच तरुणांना देवरुख पोलीस स्थानकात आणण्यात आलं होतं. मुंबई-गोवा महामार्गावर यापूर्वी प्रवाशांना लुटण्याचा प्रकार कधीच घडलेला नव्हता. यामुळे देवरुख पोलिसांचा संशय बळावला आणि वेगाने याचा उलगडा केला.