Ratnagiri Rain Update : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर सध्या दिसून येत आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. जिल्ह्यात 6 ते 9 सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला असून जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याच्या दापोली, चिपळूणमध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याचं चित्र आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली असून जुना बाजार पुलाला पाणी लागलं आहे. तर दापोलीतील आंबेडकर चौक, जालगाव, भारतनगर, शिवाजी नगर, केळसकर नाका, नागरपुरी या ठिकाणी देखील पाणी शिरलं होतं. पण, मध्यरात्री काही काळ पावसानं विश्रांती घेतल्यानंतर या भागातील पाणी ओसरलं आहे. पण, पावसाच्या परिस्थितीकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ मात्र व्यापाऱ्यांच्या काळजीत वाढ होत आहे. 


नदी काठच्या नागरिकांची चिंता वाढली


सध्या जिल्ह्यातील प्रमुख नद्या ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे नदी किनारी असलेल्या चिपळूण, संगमेश्वर बाजारपेठेतील नागरिकांच्या चिंता वाढल्या आहे. महिनाभरापूर्वी आलेल्या पुराच्या आठवणी ताज्या असताना ऐन गणेशोत्सवात पूरपरिस्थिती आल्यास करायचं काय? सामान भरलेलं असल्यानं त्याचं नुकसान झाल्यास आम्हाला उभं राहणं देखील कठिण होणार असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. शास्त्री, सोनवी, वाशिष्ठि, जगबुडी या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. पावसानं उसंत घेतल्यानं सध्या व्यापाऱ्यांना हायसं वाटत असलं तरी पावसाचा जोर वाढल्यास व्यापाऱ्यांच्या काळजी भर पडत आहे. 


समुद्राला भरती


मुसळधार पावसाचा इशारा आणि समुद्राला येणारी भरतीची वेळ देखील एकच होत असल्याचं सध्या दिसून येत आहे. जिल्ह्यात 11.47 वाजता भरती असून यावेळी 3 मीटरपर्यंत लाटा उसळणार आहेत. त्यामुळे समुद्र किनारी असलेल्या नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. भरती आणि नद्यांना पूर आल्यास नद्यांना फुगवटा येतो आणि पाणी मानवीवस्तीत शिरल्याचं यापूर्वी दिसून आलेलं आहे.


नांदेडमध्ये पावसाची कोसळधार 


जिल्ह्यात सर्वत्र अतिमुसळधार पाऊस झाला असून अनेक शिवारात नदीकाठच्या जमिनी आणि पिकं खरडून गेली आहेत. अर्धापूर तालुक्यातील मुखेड, नायगाव, नरसी, बिलोली, हदगाव, अर्धापूर तालुक्यातील अनेक गावात पावसाचे पाणी शिरले असून लघुळ, उंद्री, तळणी, शेलगाव या गावांचा शहरांशी संपर्क तुटला आहे. पंधरा दिवसांनंतर काढणीला येणाऱ्या सोयाबीनचं पीक पाण्याखाली गेल्यामुळं हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे. इसापूर धरण 90 टक्के भरलं असून विष्णूपुरी प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला, विष्णूपुरी धरणाचे नऊ दरवाजे उघडले