रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातल्या मुचरी गावात जल्लोषात एक सेलिब्रेशन सुरु आहे. पार्वती मोरे या आजीबाईंचा 100 वा वाढदिवस अख्ख्या गावाने साजरा केला.


1 जुलै 1917 रोजी आजींचा जन्म झाला. तब्बल 100 वर्षांचा हा प्रवास सेलिब्रेट करण्यासाठी अख्खा गोतावळा एकत्र आला. पार्वतीबाईंचे पती सैन्यात होते. त्यामुळे लष्करातली शिस्त घरात आली. शेतीही बक्कळ... त्यामुळे अंगमेहनत नसानसात भिनली.

पार्वतीबाई 100 वर्षात कधीही अंथरुणाला खिळल्या नाहीत. ना दमा, ना रक्तदाब, ना मधुमेह आणि ना सांधेदुखी. आजही पार्वतीबाई घरातला केरकचरा स्वतः काढतात. आंघोळीचं पाणी त्या स्वतः काढतात. परावलंबित्व टाळल्याने आजही त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.

मुलं, सुना, नातू, नातसुना, पणतू अशा वंशवेलींनी पार्वतीबाईंचा वटवृक्ष सजला आहे ज्याला पार्वतीबाईंच्या शतकी वाढदिवसानं साज चढला आहे.