सांगली : सांगली जिल्ह्यातील विटामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरु असलेला रेशनधान्याचा घोटाळा उघडकीस आणला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खानापूर तालुका अध्यक्ष साजिद आगा यांनी हा रेशनधान्याचा घोटाळा उघडकीस आणला. पुरवठा विभागाने एका पोल्ट्रीच्या गोडाऊनमध्ये टाकलेल्या छाप्यात 221 तांदळाची पोती तर 98 गव्हाची पोती असे एकूण असे एकूण 319 पोती धान्य सापडले. छाप्यात सापडलेल्या या धान्याचा पंचनामा करण्यात आला आहे.
खानापूर तालुक्यातील गोरगरिबांच्या हक्काचे धान्य विटा येथील कराड रोडवर गोकुळ मंगल कार्यालयाजवळ असलेल्या एका पोल्ट्रीमध्ये रेशनधान्य असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खानापूर तालुकाध्यक्ष साजिद आगा व सचिव कृष्णा देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार मनसेचे तालुकाध्यक्ष साजिद आगा यांनी नायब तहसीलदार व धान्य पुरवठा अधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.
नायब तहसीलदार व अन्नपुरवठा अधिकारी व पोलीस यांच्या पथकाने आज दुपारी कराड रोडवर गोकुळ मंगल कार्यालयाजवळ असलेल्या संबंधित पोल्ट्रीचे गोडाऊन उघडले. त्या गोडाऊनमध्ये 221 तांदळाची पोती व 98 गव्हाची पोती असे एकूण असे एकूण 319 पोती धान्य सापडले. सापडलेल्या या धान्याचा पंचनामा करण्यात आला आहे.
गोकुळ मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या गोडाऊनमध्ये अवैध धान्यसाठा केल्याबाबत प्राप्त तक्रारीनुसार पुरवठा निरीक्षक व प्रभारी नायब तहसीलदार यांनी पोलिसांसमवेत गोडाऊनची पाहणी केली त्याठिकाणी 221 तांदूळ पोती व गहू 98 पोती (प्रत्येकी पन्नास किलोची) आढळून आली. संबंधित गोडाऊन मालक तुकाराम भाऊ गायकवाड यांनी हे गोडाऊन रामभाऊ आनंदराव सपकाळ यांना भाड्याने चालवायला दिले आहे असे समजते. रामभाऊ सपकाळ यांनी या धान्याबाबत कोणतीही कागदपत्र सादर केलेली नाही. त्यामुळे सदरचा धान्यसाठा अवैध असून काळा बाजार विक्रीच्यादृष्टीने आणल्याचे दिसून आल्याने गोडाऊन सील करून जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलमान्वये फिर्याद दाखल करण्याबाबत पुरवठा निरीक्षक यांच्यामार्फत कार्यवाही सुरू केली असल्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी सांगितले.