मुंबई: राज्याला पहिली महिला पोलीस महासंचालक मिळण्याची शक्यता असून वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांचे नाव त्यासाठी चर्चेत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये सेवानिवृत्त होणारे रजनीश सेठ व्हीआरएस घेऊन नवी जबाबदारी स्वीकारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या जागेवर पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांच्या नावाची चर्चा आहे.
रश्मी शुक्ला या सध्या केंद्रात प्रतिनिुक्तीवर आहेत. रश्मी शुक्ला यांचे नाव राज्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये चर्चेत आले होते. महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरु झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप (Rashmi Shukla Phone Tapping Case) केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता.
सध्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ हे एमपीएससीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेणार असल्याची माहिती आहे. रजनीश शेठ यांचा कार्यकाल हा डिसेंबर पर्यंत आहे. पण त्या आधीच ते स्वेच्छा निवृत्ती घेणार असून एमपीएससीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर शिंदे-फडवणीस सरकार सत्तेत आलं. त्यानंतर रश्मी शुक्ला यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती. रश्मी शुक्ला यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. रश्मी शुक्ला यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.
Rashmi Shukla Phone Tapping Case : रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात क्लीन चिट
पुणे पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात 'क्लोजर रिपोर्ट' दाखल केला आहे. यामध्ये काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कोर्टाने असा अहवाल स्वीकारला की केस बंद केली जाते. एखादा गुन्हा चुकून नोंदवला गेला किंवा तक्रार दिवाणी स्वरूपाची असल्याचे आढळून आल्यास पोलिसांकडून 'क्लोजर रिपोर्ट' दाखल केला जातो.