वाशिम : महिला अत्याचाराच्या घटना राज्यात दिवसेंदिवस वाढच चालल्या आहेत. अशात आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणासारखं प्रकरण वाशिममध्ये घडलंय. मात्र या घटनेत पीडितेचं नशीब बलवत्तर म्हणून ती वाचली.  नागपूरवरुन वाशिममार्गे पुण्याला जाणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणीवर चालत्या खासगी बस ट्रॅव्हल्समध्ये बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी गोंदिया जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. ही घटना सहा जानेवारीची आहे. पीडित मुलीनं पुण्यात पोहोचल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी हा या बसचा क्लिनर असून त्याचं नाव समीर देवकर असं आहे.


21 वर्षीय तरुणीवर चालत्या ट्रॅव्हल्समध्ये वाशिमच्या मालेगाव परिसरात बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. वाशिमच्या मालेगाव पोलीस ठाण्यात सदर बस जप्त केली आहे. माहितीनुसार गोंदियाची ही पीडित तरुणी नागपूरवरून तरुणी पुण्याला जाण्यासाठी निघाली होती. मात्र वाशीमच्या कारंजा दरम्यान गाडीच्या क्लिनरने त्या पिडीत तरुणीला तुमची सीट ही नसल्याचं सांगून मागच्या सीटवर बसवलं. त्यानंतर तरुणीला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन विनयभंग करून बलात्कार केला. तसंच या घटनेची वाच्यता केल्यास चालत्या गाडी तुन फेकून देण्याची धमकीही दिली.


दरम्यान पुणे पोलिसांनी वाशिम पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग केला असून पोलिसांनी घडलेल्या घटनेमधील गुडविल्स कंपनीची ट्रॅव्हल्स जप्त केली आहे. आरोपी समीर देवकर हा फरार असून त्याचा शोध सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितले.