...तर शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो : रावसाहेब दानवे
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 11 May 2017 03:17 PM (IST)
औरंगाबाद : शेतकऱ्यांना हिणवणारं वक्तव्य केल्याप्रकरणी अखेर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 'शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरलेला नाही, मात्र त्यांची मनं दुखावली गेली असल्यास, दिलगिरी व्यक्त करतो' अशा शब्दात दानवेंनी खेद व्यक्त केला आहे. 'माझा आणि कार्यकर्त्यांचा हा संवाद आहे. यामध्ये मी शेतकऱ्यांना उद्देशून कोणताही अपशब्द वापरला नाही. मी स्वतः शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला आहे. शेतकऱ्यांचे दु:ख मला माहिती आहे. शेतकऱ्यांची बाजू घेत सतत 35 वर्ष मी राजकारणात आहे. त्यामुळे मी शेतकऱ्यांबद्दल कधीही अपशब्द वापरु शकत नाही. माझ्या आणि कार्यकर्त्यांच्या संवादाला शेतकऱ्यांशी जोडू नये. परंतु यावरही शेतकऱ्यांची मनं दुखावली गेली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.' असं म्हणत रावसाहेब दानवेंनी खंत व्यक्त केली आहे. दानवेंची वादग्रस्त वक्तव्य : हजार-पाचशेच्या नोटा असतील तर द्या, मी बदलून देतो : दानवे “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी केल्यानंतर सर्वाना धक्का बसला. मात्र, तुमच्याकडे नोटा असतील तर द्या माझ्याकडे, मी बदलून देतो आणि आपल्याजवळ कुठे नोटा बंद आहेत?”, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी चिखलीतील सभेत केलं. “दुष्काळ नव्हता, तरी ओरडून सांगितलं म्हणून मदत मिळाली” “गेल्या वर्षी अख्ख्या मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ नव्हता, मात्र आम्ही मुद्दाम फाडून सांगायचो की, खूप दुष्काळ आहे. माणसं स्थलांतर करत आहेत, जनावरं मरत आहेत आणि हे खोटे चित्र उभे आम्ही करत होतो. याचा परिणाम असा झाला की 68 वर्षांत पहिल्यांदा 4200 कोटींची मदत मिळाली.”, असं धक्कादायक वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलं होतं. ”… त्या लक्ष्मीचा स्वीकार करा” पैठणमधील प्रचारसभेत बोलताना रावसाहेब दानवेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा.”, असं वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. कर्जमाफीनंतर आत्महत्या थांबतील हे लेखी द्या : दानवे कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबणार असतील, तर विरोधकांनी एकत्र यावं आणि त्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा लेखी प्रस्ताव द्यावा, असं अजब वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. ते आज शिर्डीत बोलत होते.