कोल्हापूर :  ग्लोबल टीचर रणजित डिसले गुरुजी (RANJITSINH DISALE) यांच्या रजेच्या मुद्द्यावरून सध्या सोलापूरचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार हे चांगले चर्चेत आले आहेत. जाणीवपूर्वक डिसले गुरुजी यांचा रजेचा अर्ज मंजूर केला नसल्याचा आरोप लोहार यांच्यावर आहे. लोहार हे सोलापूरच्या आधी कोल्हापूरमध्ये शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. कोल्हापूरमधील लोहार यांची कारकीर्द वादग्रस्त आहे. 


सध्या चर्चेत असलेले शिक्षणाधिकारी किरण लोहार हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील आहेत. कामकाजाच्या प्रत्येक ठिकाणी वादग्रस्त अधिकारी म्हणून लोहार यांच्यावर शिक्का मारण्यात आला. कोल्हापूरमधील लोहार यांची कारकीर्द तर चांगलीच गाजली होती. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहातच किरण लोहार यांच्यावर पैसे घेतल्याचे आरोप सदस्यांनी केले. शिवाय अनेक गंभीर तक्रारीवरूनच त्यांना जिल्हा परिषदेमधून एकतर्फी कार्यमुक्त केले. मात्र पुढे ते मॅटमध्ये गेले. लोहार यांच्या मुद्द्यावरून संपूर्ण सभागृह एकदा बंद पडले होते.


किरण लोहार यांच्या वादग्रस्त कामकाजाच्या चौकशीचा अहवाल तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षांकडे पाठवला होता.  चौकशी समितीने लोहार यांच्या कामकाजासंबंधी 43 तक्रारींची चौकशी केली होती. त्यामध्ये कर्तव्यात कसूर करणे, दप्तर दिरंगाई करणे, सरकारी नियमांचे उल्लंघन करणे,  हेतुपूर्वक जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गैरहजर राहणे असे आरोप लोहार यांच्यावर ठेवण्यात आले होते.


किरण लोहार हे इतके चर्चेत राहिले होते की, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील वादग्रस्त अधिकारी लोहार कुठे आहेत? असा सवाल लोकशाही दिनाच्या निमित्ताने सभागृहात विचारला होता. तर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे देखील लोहार यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या. आधी कोकण नंतर कोल्हापूर आणि आता सोलापूर...या सर्वच ठिकाणी किरण लोहार हे वादग्रस्त अधिकारी म्हणून चर्चेत आले आहेत.


रणजित डिसले गुरुजींवर कारवाई करणारे सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना ते जेव्हा कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी म्हणून काम करत होते तेव्हा  कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा या विद्यापीठाकडून ऑनररी पी एच डी पदवी प्रदान करण्यात आली होती . पण ज्या संस्थेकडून ही पदवी देण्यात आली ती कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा ही संस्थाच मुळात बोगस असल्याचं शिक्षण संचालकांच्या चौकशीत उघड झालं होत . त्यांनतर या संस्थेच्या विरुद्ध शिक्षण संचालकांच्या तक्रारीनंतर पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनमध्ये 2019 मध्ये गुन्हाही नोंद करण्यात आला होता , त्याचबरोबर टोंगा या देशानेही त्यांच्याकडे आशा नावाचे कोणते विद्यापीठ नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.


संबंधित बातम्या


ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसलेंना सरकारी 'बाबूं'चा त्रास, नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत


ग्लोबल टीचरची लोकल कुचंबणा! जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांची फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी रजा मंजूर करण्यात आडकाठी