नागपूर : कुख्यात गँगस्टर आपल्या टोळीमार्फत प्रतिस्पर्धी गुंडांची हत्या घडवतो आणि नंतर दुसऱ्या एका गुन्ह्यात हत्या झालेल्या त्या तरुणाचे नाव गोवून तो फरार झाल्याचा कांगावा करतो. गुन्ह्याचा उलगडा होईपर्यंतच्या 9 वर्षात हा गँगस्टर मात्र व्हाईट कॉलर,  सामाजिक कार्यकर्ता, राजकीय नेता आणि गरीबांचा रॉबिनहूड बनून खुशाल जीवन जगतो. एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाला साजेसा असा पट प्रत्यक्षात नागपुरात घडला आहे.  रणजित सफेलकर नावाच्या कुख्यात गॅंगस्टरने कशा पद्धतीने 9 वर्षांपूर्वी केलेल्या एका हत्या प्रकरणाला फक्त पोलिसांपासून लपविलेच नाही तर हत्या केलेल्या मनीष श्रीवास नावाच्या तरुणाचे नाव पुढच्या गुन्ह्यात गोवून पोलिसांना मृत माणसाच्या शोध कामात लावून दिले. नागपुरातील गुन्हे जगताची ही भन्नाट घटना डोळ्यात अंजन घालणारी आहे.

  


रणजीत सफेलकर... काहींच्या नजरेत सामाजिक कार्यकर्ता... काहींच्या नजरेत राजकीय नेता.... तर काहींच्या नजरेत तो गरीबांचा रॉबिनहूड.... मात्र, त्याच्या अनेक चेहऱ्यामागचा मागचा खरा चेहरा नागपूर पोलिसांनी समोर आणला आहे. पोलीस तपासात काय पुढे आलंय हे जाणून घेण्यापूर्वी रणजित सफेलकर ने नऊ वर्षांपूर्वी कोणती युक्ती लढवत पोलिसांच्या आणि समाजाच्या नजरेत धूळफेक केली होती हे आपण जाणून घेणे महत्वाचे आहे.


काय घडलं होतं नऊ वर्षांपूर्वी 
2008 ते 2012 या काळात नागपुरात गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या कार्यरत होत्या. त्यापैकी एका सर्वात शक्तिशाली टोळीचा म्होरक्या होता कामठीचा रणजीत सफेलकर. मात्र, त्याच काळी पाचपावली परिसरातील मनीष श्रीवास नावाचा तरुण गुंड सफेलकर टोळीवर भारी पडू लागला होता. श्रीवास भविष्यात आपला गेम करेल या भीतीने रणजीत सफेलकरने 5 मार्च 2012 रोजी एका तरुणीचं आमिष दाखवत आंबटशौकीन मनीष श्रीवासला निर्जन भागातील शेतावरील घरात बोलाविले.  त्या ठिकाणी मनीष श्रीवास पोहोचताच सफेलकर टोळीने त्याची हत्या केली.  नंतर कामठी परिसरात एका घरात त्याच्या शरीराचे तुकडे करत ते मध्यप्रदेशातील जंगलात फेकून देत मनीष श्रीवासचा नख सुद्धा पोलिसांच्या हाती लागू दिलं नाही.  आपण या हत्येच्या गुन्ह्यात अडकू नये तसेच पुढे ही पोलिसांचा संशय आपल्यावर येऊ नये यासाठी चाणाक्ष सफेलकरने एक भन्नाट युक्ती लढविली. मनीष श्रीवासच्या हत्येच्या एका आठवड्यानंतर नागपुरात घडलेल्या मॉन्टी भुल्लर हत्या प्रकरणात आपल्या हस्तकांमार्फत मनीष श्रीवासचा नाव गोवून दिलं. 


रणजित सफेलकरनं असं मजबूत केलं नेटवर्क
पोलीस देखील मनीष श्रीवासच्या हत्या प्रकरणापासून अनभिज्ञ असल्याने मॉन्टी भुल्लर हत्या प्रकरणात मनीष श्रीवासला मुख्य आरोपी मानून त्याचा शोध घेऊ लागले. कारण मनीष श्रीवासचा मृतदेह कुणालाच मिळाला नव्हता. अनेक वर्ष मनीष श्रीवासचा कुठेच पत्ता लागला नाही. श्रीवास याच्या कुटुंबीयांनी ही त्याला हत्या प्रकरणातला फरार आरोपी मानून तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांना दिली नाही. फक्त कामठीच नाही तर विदर्भासह मध्यप्रदेशापर्यंत रणजित सफेलकरची श्रीराम सेना वाढत गेली. तरुण त्याला स्वतःचा आदर्श मनू लागले. तो विविध धार्मिक, सामाजिक आणि राजकीय व्यासपीठांवर झळकू लागला. त्याला रॉबिन हूड मानणारे लोकं त्याच्या मिरवणुका काढू लागले. आणि गुन्हेगारातून राजकीय नेता झालेला सफेलकर छुप्या पद्धतीने आपल्या टोळी मार्फत गुन्हे करत राहिला. मोक्याच्या जमिनी हडपणे, धमकावून खंडणी वसूल करणे, नागपूरसह विदर्भातून गुन्हे करून फरार झालेल्या गुन्हेगारांना आश्रय देणे आणि नंतर त्याच गुन्हेगारांना पोलिसांसमोर शरणागती पत्करायला लावून गुन्हे जगतासह पोलिसांपर्यंत आपला नेटवर्क मजबूत करणे अशी त्याची कार्यपद्धती झाली. 


 अन् असा अडकला रणजित


मात्र, नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही महिन्यांपुर्वी नागपुरातील अनेक वर्षे उलगडा न झालेल्या मोठ्या गुन्ह्यांचा नव्याने तपास सुरु केला. त्यात 2016 च्या एकनाथ निमगडे या वृद्ध आर्किटेक्टच्या हत्या प्रकरणासंदर्भात काही गुन्हेगारांकडून चौकशी होत असताना रणजित सफेलकरचा नाव समोर आलं. पोलिसांनी खोलात जाऊन चौकशी केली असता गुन्हेगारापासून सामाजिक कार्यकर्ता आणि नंतर राजकीय नेता झालेल्या रणजित सफेलकरने 5 कोटी रुपयांमध्ये एकनाथ निमगडे यांच्या हत्येची सुपारी घेत आपल्या टोळीमार्फत त्यांची हत्या केल्याचे समोर आले. जेव्हा पोलिसांनी रणजीतचा उजवा हात मानला जाणाऱ्या कुख्यात गुंड शरद उर्फ काळू हाटेला अटक केली तेव्हा त्याने सफेलकरच्या इतर गुन्ह्यांची जंत्री पुढे केली. आणि त्यात रणजित सफेलकरने मनीष श्रीवासचा गेम 9 वर्षांपूर्वीच केल्याचे समोर आले. म्हणजे ज्या मनीष श्रीवासला पोलीस गेली 9 वर्षे एका हत्या प्रकरणात शोधात होते. तो त्या हत्या प्रकरणाच्या एक आठवडा आधीच मारला गेला होता आणि रणजित सफेलकरनेच मनीष श्रीवासचं नाव गोवून पोलिसांची दिशाभूल केली होती. 


आता पोलिसांनी रणजित सफेलकरलाही अटक केली असून त्याच्या 60  लाख रुपयांच्या महागड्या कार जप्त केल्या आहेत.  आता त्याच्याकडून एकनाथ निमगडे, मनीष श्रीवास हत्या प्रकरणासह इतर अनेक प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.  मात्र, एका सराईत गुन्हेगाराने 9 वर्षे फक्त पोलिसांच्या नजरेत धूळफेक केली नाही तर भोळ्या भाबड्या जनतेला ही मूर्ख बनवत तो त्यांचा नेता बनला होता हेच या प्रकरणातून समोर आले आहे.