Rang Panchami : रंगपंचमीचा उत्साह आज सर्वत्र पाहायला मिळत आहे. धूलिवंदनापासून सुरु होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. या पाचव्या दिवशी रंग खेळून रंगपंचमी साजरी केली जाते. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून सण साजरा करतात. राज्यभर आज विविध रंगांची उधळण करत आंदोत्सव साजरा करण्यात आला. 
 
 


नाशिकमध्ये सकाळपासूनच रंगांची उधळण


नाशिकमध्ये सकाळपासूनच रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी केली जात असून रंगप्रेमींमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. कॉलेज रोडवरील कृषीनगर जॉगिंग ट्रॅकबाहेर जॉगिंग होताच जोगर्सनी गाणी गायली. एकमेकांना रंग लावत कोरडी रंगपंचमी साजरी केली. अगदी 40 ते 76 वयोगटातील मंडळी यात सहभागी होते. 


जेजुरीगड आणि कडेपठार गडावरील खंडोबा मंदिरात रंगपंचमी साजरी


महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरीगड आणि  कडेपठार गडारील मंदिरात धार्मिक वातावरणात आणि उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली. रंग पंचमीनिमित्त दोन्ही गडावरील श्री खंडोबा मंदिरात पहाटे विविध रंगांचे पंचामृत तयार करून देवाला रंगांचा अभिषेक घालण्यात आला. पूजा व आरती नंतर श्री मार्तंड भैरव, श्री खंडोबा व म्हाळसा व बानुबाई यांच्या मूर्ती व स्वयंभू शिवलिंगाना विविध रंग लावून रंगपंचमी अतिशय धार्मिक वातावरणात व उत्साहात साजरी करण्यात आली.


तुळजाभवानी मातेच्या मंदिरात रंगपंचमी साजरी, विविध प्रकारच्या 17 रंगांची उधळण


तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज रंगपंचमी सणं विविध 17 प्रकारच्या रंगांची उधळण करीत साजरा करण्यात आला. यावेळी तुळजाभवानी देवीला रंग लावण्यात आले. विशेष म्हणजे तुळजाभवानी देवीला आज भाताचा नैवैद्य अर्पण करण्यात आला. तोही विविध रंगाचा असतो. तसेच देवीचे पारंपरिक अलंकारासह खोबऱ्याचा हार घालण्यात आला. देवीचे महंत, पुजारी यांनी तुळजाभवानी देवीला रंग लावत गाभाऱ्यात रंगाची उधळण केली त्यानंतर तुळजापूर शहरात रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी नैसर्गिक कोरडे रंग वापरण्यात आले.तत्पूर्वी देवीचे विविध अलंकार घालून पूजा करण्यात आली त्यानंतर रंगांची उधळण केली. 


अवघा रंग एक झाला, पंढरीत रंगपंचमीची धूम  


पंढरीचा परमात्मा पांडुरंग हा साक्षात श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. त्यामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात वसंत पंचमी ते रंगपंचमी असा एक महिना रंगपंचमीचा सण साजरा केला जातो . जगाच्या पाठीवर एक महिना रंगपंचमीचा सण साजरा करणारे श्रीक्षेत्र पंढरपूर हे एकमेव देवस्थान आहे. या संपूर्ण कालावधीत देवाच्या अंगावर पांढरे वस्त्र परिधान करून त्यावर रोज नैसर्गिक रंगाची उधळण होत असते. याच सोहळ्याचा आज अंतिम दिवस अर्थात रंगपंचमी. त्यामुळं या सोहळ्याचा अनोखा उत्सव पंढरपूर शहरात झाला. आज येथील यमाई ट्रॅकवर शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी नैसर्गिक रंगाची मुक्तहस्ते उधळण करीत रंगपंचमी साजरी केली. यावेळी डीजेच्या तालावर शेकडोच्या संख्येने तरुण तरुणींनी बेधुंद होत ठेका धरला. त्यामुळं आज अक्षरश अबाल वृद्ध या सोहळ्यात सामील झाले होते. यावेळी संपूर्ण पर्यावरण पूरक रंगाची कोरड्या रंगांची रंगपंचमी साजरी करण्यात आली.