(शिर्डी) अहमदनगर : रामनवमी उत्सवानिमित्त साईंच्या शिर्डीतील तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. साईबाबा संस्थानने रामनवमीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केली आहे. 24 मार्च ते मार्च ते 26 मार्च दरम्यान तीन दिवस रामनवमी उत्सव साजरा केला जाणार आहे.


रामनवमी उत्सावाच्या मुख्य दिवशी साईमंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. साईबाबा समाधी शताब्दी वर्ष असल्याने यंदाची रामनवमी भाविकांच्या दृष्टीने महापर्वणी ठरणार आहे.

शिर्डीतील रामनवमी उत्सव 1911 साली सुरु झाला. रामनवमी निमित्त साईबाबा संस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता भाविकांसाठी ठिकठिकाणी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे.

रामनवमी उत्सवानिमित्त मुंबई येथील द्वारकामाई मंडळाच्या वतीने भव्य प्रवेशद्वार उभारण्याचं काम सुरु आहे. याठिकाणी शिव भोला भंडारी अशा आशयाचा 50 फुटी देखावा उभारण्यात येतो आहे.

रामनवमी उत्सव म्हणजे शिर्डी गावची जत्रा त्यामुळे या उत्सवाला महत्व प्राप्त झालं आहे. रामनवमीला मुंबई येथून सर्वात जास्त भाविक पायी शिर्डीला येत असतात. पायी येणाऱ्या भाविकांसाठी संस्थानकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले.