Ramesh Deo : मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. सिनेसृष्टीतील कलाकारांसह राजकीय नेत्यांनीदेखील रमेश देव यांना  श्रद्धांजली वाहिली आहे. रमेश देव यांनी एक उत्तम कलावंत म्हणून आयुष्यभर कलाक्षेत्राची सेवा केली आहे. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाची छाप उमटवणारा, मनस्वी असा अभिनेता आपण आज गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 


सदाबहार अभिनयाची छाप उमटवणारा अभिनेता गमावला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 


मुख्यमंत्री पुढे म्हणाले,"ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचा परवाच वाढदिवस होता. शुभेच्छांचा ओघ सुरू असतानाच त्यांचे आपल्यातून जाणे दुःखदायक आहे. रमेश देव यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. दोन्हीकडे आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्यांचे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेहबंध होते. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणातही संधी आजमावली होती. चित्रपट सृष्टीत त्यांना आदराचे स्थान होते. देव कुटुंबीयांकडून  कला क्षेत्राची अविरत सेवा सुरू आहे. दिवंगत रमेश देव हे कला क्षेत्रात दोन पिढ्यांना जोडणारा महत्त्वाचा आणि मार्गदर्शक असा दुवा होते. त्यांनी सदाबहार आणि मनस्वी कलाकार अशी प्रतिमा आयुष्यभर जपली. त्यांचे चित्रपट क्षेत्रातील योगदान विसरता येणार नाही असे आहे. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली". 


मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीचा एक गौरवशाली अध्याय संपला; अजित पवार


उपमुख्यमंत्री अजित पवार शोक व्यक्त करत म्हणाले,"ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनाने मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या. रमेश देव यांच्या अभिनयाने मराठी कलारसिकांच्या पिढ्यांना मनमुराद आनंद दिला". मराठी कलासृष्टी समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले असेही अजित पवार म्हणाले. रमेश देव यांच्या कुटुंबियांच्या, रसिक चाहत्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.


मराठी सिनेमाचा गौरव हरपला; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस


देवेंद्र फडणवीस यांनीदेखील श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ अभिनेते श्री रमेश देव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीचा गौरव हरपला आहे. मराठी सिनेमासृष्टीची फार मोठी हानी त्यांच्या निधनाने झाली आहे, अशी शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.


कलाक्षेत्रात जिंदादिल मुशाफिरी करणारे एक जुने-जाणते व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड; सुप्रिया सुळे


सुप्रिया सुळेंनी शोक व्यक्त करत ट्वीट केले आहे की,"प्रख्यात अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक रमेश देव यांचे निधन झाल्याची बातमी दुःखद आहे. सुमारे 285 चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय रंगभूमीवरही त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या निधनामुळे कलाक्षेत्रात जिंदादिल मुशाफिरी करणारे एक जुने-जाणते व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली".


एका चतुरस्त्र अभिनेत्याला आपण गमावलं; रोहित पवार
रोहित पवार शोक व्यक्त करत म्हणाले,"ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन झाल्याची वार्ता ऐकून अतीव दुःख झालं आहे. एका चतुरस्त्र अभिनेत्याला आपण गमावलं आहे. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!"


संबंधित बातम्या


ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


Ramesh Deo : "असा नट होणे नाही", रमेश देव यांच्या निधनानंतर मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या प्रतिक्रिया


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha