Ramesh Deo : मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचे निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Continues below advertisement

रमेश देव यांच्या आठवणींना उजाळा देताना अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले,"त्यांच्या वयामध्ये आणि आमच्या वयामध्ये 30-40 वर्षाचं अंतर आहे. पण त्यांनी काम करताना ते अंतर कधीही जाणवू दिलं नाही. मी त्यांच्यासोबत दोन चित्रपट केले आहेत. त्यांच्यासोबत काम करताना सेटवर फार मजा यायची. एखाद्या मित्रासारखे ते वागवायचे. ते माझे नेहमीच कौतुक करायचे. कायम ते टकाटक असायचे. एक खूप मोठा माणूस इंडस्ट्रीने गमावला आहे". 

अभिनेते अशोक सराफ म्हणाले," रमेश देव यांचं जाणं म्हणजे मराठी सिने-सृष्टीला खरच खूप मोठा धक्का आहे. एक मोठा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नट आज आपल्यातून गेला आहे. असा माणूस होणे नाही.1967 साली मी त्यांच्यासोबत पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर काम केले आहे. माझा पहिला शॉट त्यांच्यासोबतचा होता. मी त्यांना रमेश भय्या म्हणायचो. ते मला मोठ्या भावासारखे होते. माझ्यावरदेखील त्यांचं विलक्षण प्रेम होतं". 

Continues below advertisement

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री अलका कुबल म्हणाल्या,"ते नेहमीच सेटवर हजर असायचे. त्याचं पाठांतर उत्तम होतं, वाणी स्वच्छ होती. इंडस्ट्रीत त्यांच्यासारखी खूप कमी लोक पाहयला मिळतात. त्यांनी गेल्या अनेक वर्षांत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. ते नेहमी वेगवेगळे किस्से सांगायचे. त्यांना कधीच कसला मोठेपणा नव्हता". 

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले रमेश देव यांच्या आठवणींना उजाळा देत म्हणाले," रमेश देव यांना आयुष्यात कोणतचं व्यसन नव्हतं. ते अत्यंत निर्मळ होते. त्यांना बघत बघत आणि त्यांच्यासोबत काम करत आम्ही मोठे झाले आहोत. मला प्रचंड वाईट वाटत आहे".

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले,"रमेश देव यांना मराठीतील देवानंद म्हटलं जायचं. दोघेही चिरतरुण अभिनेते होते, त्यासोबतच निर्माते, दिग्दर्शकही होते. चित्रकर्मींचा परिवार रमेश देव यांनी निर्माण केला होता. मराठी व हिंदी चित्र क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणारे रमेश देव आज खऱ्या अर्थाने देवाच्या दरबारात रुजू झाले आहेत".

संबंधित बातम्या 

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास