Ramdas Kadam VS Gajanan Kirtikar : शिवसेना शिंदे गटात ऐन दिवाळीमध्ये शिमगा सुरू झाल्याने चर्चांना उधाण आले होते. खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) आणि रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाची धार तीव्र झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी थेट हस्तक्षेप केला. मुख्यमंत्र्यांनी खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आज रामदास कदम यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर चर्चा केली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना रामदास कदम यांनी आपल्या मनातील खदखद पुन्हा एकदा व्यक्त करत आता वादावर पडदा पडला असल्याचे म्हटले.
ज्याची जळते, त्यालाच कळते...
गजानन कीर्तीकरांच्या खासगी आयुष्यावरून केलेल्या टीकेचे रामदास कदम यांनी समर्थन केले. खासगी टीका करणे योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. रामदास कदमवर गद्दारीचा शिक्का आहे असे म्हणणे हे कितपत योग्य आहे, माझ्या हत्येसाठी सुपारी देण्यात आल्या, पक्षासाठी जीव धोक्यात घातला. रामदास कदमला संपवण्यासाठी प्रेसनोट काढणे किती योग्य असा प्रश्नच कदम यांनी केला. 30 वर्षानंतर मी त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला, हे आता कळलं का? रामदास कदम यांना संपवण्यासाठी थेट प्रेस नोट काढण्यात आली. कालपर्यंत गजाभाऊ हे अनेकदा घरी आलेत, चहा-जेवण केले आणि अचानकपणे आता गद्दार म्हणतात हे कितपत योग्य आहे असा सवाल रामदास कदम यांनी केला.
मी कधीही कमरेखाली टीका केली. माझ्यावर गजाभाऊंनी चुकीचे आरोप केले. 50-55 वर्षाच्या राजकारणात कोणताही डाग लावून घेतला नाही. त्यामुळे अशा आरोपांनी व्यथित झालो असून ज्याची जळते त्याला कळते अशा शब्दांत आपली खदखद व्यक्त करत कदम यांनी आता वाद संपला असल्याचे म्हटले.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय झालं?
पक्षातील दोन नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादाची दखल शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी घेत गजानन कीर्तीकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर वर्षावर रामदास कदम यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी बोलताना रामदास कदम यांनी म्हटले की, आमच्यातील वादावर पडदा पडला आहे. गजानन कीर्तीकर यांनी थेट प्रेस नोट काढण्यापेक्षा मुख्य नेत्यांसोबत चर्चा करावी असेही कदम यांनी म्हटले. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून गजानन कीर्तीकर हे खासदार आहेत आणि भविष्यात पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास आपण त्यांच्या प्रचाराला जाऊ असेही कदम यांनी स्पष्ट केले.