Ramdas Kadam Exclusive Interview : कोकणातील प्रमुख नेते अशी ओळख असणाऱ्या रामदास कदम यांची शिवसेनेनं हकालपट्टी केली. सध्या राज्यात शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा टोकाचा संघर्ष सुरु आहे. या दरम्यान रामदास कदम यांनी त्यांच्या मनातील खदखद 'एबीपी माझा'सोबतच्या विशेष मुलाखतीत बोलून दाखवली.


रामदास कदमांच्या मुलाखतीतील 10 महत्त्वाचे मुद्दे


1. 'आम्ही शिवसेनेसाठी संघर्ष केला'
रामदास कदम यांनी सांगितलं आहे की, 'छगन भुजबळ फुटले तेव्हा मी संघर्ष केला. नारायण राणे फुटले तेव्ही मी संघर्ष केला. राज ठाकरे फुटले तेव्हा मी संघर्ष केला. हकालपट्टी करताना आमच्या संघर्षाची आठवण ठेवा. उद्धव साहेब तुम्ही हकालपट्टी केली नाही मी राजीनामा दिला. मी माझ्या मनातून तुम्हांला काढलंय. 52 वर्षे काम करणाऱ्या एका शिवसैनिकावरती राजीनामा देण्याची वेळ का येते याचं आपण आत्मपरिक्षण केलं पाहिजे.'


2. 'उद्धवसाहेब आत्मपरिक्षण करा, आणखी किती जणांचा हकालपट्टी करणार'
उद्धव साहेब आणखी किती जणांचा हकालपट्टी करणार आहात. 51 आमदारांची हकालपट्टी केली. उद्या 12 खासदार जातील त्यांची हकालपट्टी कराल. शेकडो नगरसेवकाची हकालपट्टी केली. आता मातोश्रीवर बसून तुम्हांला केवळ हकालपट्टी करणं एवढंच काम राहिलं आहे का? ही परिस्थिती का आली याचं आत्मपरिक्षण करा, असं आवाहन रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना केलं आहे.


3. रामदास कदम यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
रामदास कदम यांनी यावेळी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 'आदित्य ठाकरेंचं वय काय? ते आमदारांना काय बोलतात? त्यांनी थोडं तरी भान ठेवा. आदित्य ठाकरे यांनी गुवाहाटी गेलेल्या आमदारांबाबतच वक्तव्य चुकीचं.'


4. 'एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो, त्यांनी शिवसेना वाचवली'
यावेळी रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे आणि 51 आमदारांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटलं की, 'मी एकनाथ शिंदे आणि 51 आमदारांचे आभार मानतो त्यांनी शिवसेना वाचवली. आम्ही टाहो फोडून सांगत होतो. राष्ट्रवादीच्या आमदाराला ताकद देऊन शिवसेनेचा आमदार कसा संपवायचा हा कट पवार काका-पुतण्यांनी केलं. मागील अडीच वर्षात शिवसेना संपवण्याचं काम पवार काका-पुतण्यांनी केलं आणि त्यामध्ये ते काही अंशी यशस्वीही झाले.' 


5. 'आज बाळासाहेब जिवंत असते तर...'
दरम्यान यावेळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी प्रश्न विचारला आहे. 'आज बाळासाहेब जिवंत असते तर... ज्या बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत संघर्ष करुन हिंदुत्व उभं केलं, हिंदुह्रदयसम्राट म्हणून पदली मिळवली त्या बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करु दिली असती का', असा सवाल रामदास कदम यांनी विचारला आहे.


6. 'शिवसेना संपवण्याचं काम पवार काका-पुतण्यांनी केलं'
उद्धव ठाकरे आजारी असताना कोकणात शरद पवार पक्ष कसा फोडतात हे आपण वेळोवेळी पुराव्यांसह उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचं गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केलाय. 'मी आणि इतर सर्व आमदारांनी कागदपत्रांसह ही बाब समोर आणली होती. मात्र पक्ष संपला तरी चालेल, आमदार गेले तरी चालतील, खासदार गेले तरी चालतील पण शरद पवारांना सोडायचं नाही अशी तुमची भूमिका होती.', असंही कदम यांनी सांगितलं. शरद पवार शिवसेना फोडण्यात यशस्वी झाले, असा आरोप कदम यांनी केला आहे. बाळासाहेब असताना जे शरद पवारांना जमलं नाही ते पवारांनी उद्धवजींनासोबत घेऊन केलं आणि डाव साधला. नशीब अडीच वर्षात हे थांबलं, पाच वर्षात शिवसेना पूर्णच संपली असती. 


7.  'माझ्या मुलाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न'
'कधी हा दिवस येईल असं वाटलं नव्हतं. माझ्या मुलाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला', असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. 


8. 'मागील तीन वर्ष तोंड दाबून बुक्क्यांचा मार सोसला'
रामदास कदम यांनी सांगितलं की, 'मी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार बनवण्याच्या विरोधात होतो. मला उद्धव ठाकरेंनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मनाई केली होती. मागील तीन वर्ष मी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केला.'


9. 'मी आता एकनाथ शिंदेसोबत सभा जाणार'
तुटलेलं कसं जोडता येईल, याकडे आपण लक्ष देणार असल्याचं सांगितलं. 'मी आता एकनाथ शिंदेंसोबत जाऊन सभा, बैठका घेणार, पण मातोश्रीबाबत कुणालाही काही टीका करू देणार नाही, असं रामदास कदम यांनी सांगितलं आहे. 


10. 'अनिल परबांसारख्या लोकांची हकालपट्टी करा'
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना आवाहन केलं आहे की, 'अनिल परब यांच्यासारख्या लोकांची हकालपट्टी करा. त्याचं पक्षासाठी काहीही योगदान नाही, मात्र ते इतरांची हकालपट्टी करतात.'


महत्त्वाच्या इतर बातम्या