Devendra Fadnvis Vidarbha Daura : राज्यभराला मुसळधार पावसानं झोडपलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर आहेत. पुरामुळे  शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर आहेत. फडणवीस वर्धा आणि चंद्रपूरमधील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. फडणवीस वर्धा येथे दाखल झाले असून त्यांनी हिंगणघाटमध्ये पुरामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी केली.


वर्ध्यातील पूरस्थिती फडणवीसांकडून पाहणी
वर्ध्यातील हिंगणघाट येथे देवेंद्र फडणवीस यांनी शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आणि पूरपरिस्थितीची माहिती करुन घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली की, 'पूरस्थितीचा पाहणी केली. मुसळधार पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे. शेतीमध्ये पाणी शिरून खूप नुकसान झालं आहे. येथील सरपंचांनी माहिती दिली की, दुबार पेरणीही पाण्याखाली गेली आहे. लगेच पेरणी करणं शक्य नाही. पुन्हा शेतीसाठी खूप मेहनत करावी लागेल. त्यामुळे ही परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना योग्य मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.'


 



बाधित भागांमध्ये बचावकार्य सुरु
राज्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांत पाणी साचून जीवन विस्कळीत झालं आहे. पुरामुध्ये अद्यापही अनेक जण अडकले आहे. पुरामध्ये अडकलेल्यांचं बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात ठिकठिकाणी एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफची (SDRF) पथकं तैनात आहेत. त्यांच्याकडून बाधित भागांमध्ये बचावकार्य सुरु असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.


रेस्क्यू केल्या नागरिकांना योग्य सुविधा मिळतील - फडणवीस
दरम्यान पुरातून सुखरुप बाहेर काढलेल्या लोकांना योग्य सुविधा देण्यात येतील, असही फडणवीस यांनी सांगितलं आहे. सध्या बचावपथकं आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं रेस्क्यू केलेल्या नागरिकांना शाळेत ठेवण्यात येत आहे. त्यांना योग्य सुविधा पुरवण्यात येतील आणि त्यांचं स्थलांतर करण्यात येणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे.