Security at Shiv Sena MP Office : शिंदे गटात जाणाऱ्या शिवसेनेच्या (Shiv Sena) संभाव्य खासदारांना सुरक्षा कवच देण्यात आलं आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांचं निवासस्थान आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर नागपूरमधील रामटेकचे खासदार कृपाल तुमाने (MP Krupal Tumane) यांच्या घर आणि कार्यालयाबाहेर सुरक्षाव्यवस्था वाढवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यासोबत जाणाऱ्या संभाव्य खासदारांना सुरक्षा पुरवण्यात येत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.


हेमंत गोडसे यांच्या घर आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त 
नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काल रात्रीपासूनच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. हेमंत गोडसे यांचे घर आणि निवासस्थानाबाहेर 24 तास शस्त्रधारी पोलीस तैनात आहेत. यामध्ये नाशिकचे स्थानिक पोलीस, दंगल नियंत्रण पथकाच्या जवानांचा बंदोबस्त आहे. खासदार हेमंत गोडसे शिंदे गटात सहभागी झाल्याच्या चर्चांमुळे सुरक्षा पुरवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. हेमंत गोडसे यांच्या कार्यालयापासून शिवसेना मध्यवर्ती कार्यालय जवळच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदारांपाठोपाठ खासदारांचाही गट स्थापन करण्यात आला आहे.


नागपुरात कृपाल तुमानेंच्या कार्यालयाबाहेरही बंदोबस्त
शिवसेनेचे खासदारही बंड करण्याची शक्यता आहे. हे खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात. या शक्यतेनंतर महाराष्ट्रात शिवसेनेच्या खासदारांच्या घरासमोर आणि कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागपुरात रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या घर आणि कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव खासदार कृपाल तुमाने यांच्या घर आणि कार्यालयासमोर बंदोबस्त लावल्याच्या माहितीला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दुजोरा दिला आहे.


'हे' खासदार शिंदे गटात सामील होण्याची शक्यता


1. राहुल शेवाळे 
2. भावना गवळी 
3. कृपाल तुमने 
4. हेमंत गोडसे 
5. सदाशिव लोखंडे 
6. प्रतापराव जाधव  
7. धर्यशिल माने 
8. श्रीकांत शिंदे 
9. हेमंत पाटील 
10. राजेंद्र गावित 
11. संजय मंडलिक 
12. श्रीरंग बारणे 


हे खासदार शिंदे गटात सहभागी होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. लोकसभेत "आम्हीच शिवसेना" असा दावा करणार आहेत. यात राहुल शेवाळे गटनेते आणि भावना गवळी यांची प्रतोदपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. आठवडाभरापूर्वी नंदनवन इथे एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली होती. संजय मंडलिक अजूनही तळ्यातमळ्यात आहेत अशी माहिती आहे. तर अजून एक तेरावे खासदार शिंदे यांच्या संपर्कात, ते जर आले तर या गटाची मेजॉरिटी पूर्ण होणार आहे.


Hemant Godse Security : खा. हेमंत गोडसेंची सुरक्षा वाढवली, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांमुळे बंदोबस्त


Nagpur : MP Krupal Tumane यांच्या घर आणि कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त, बंडाची शक्यता?