मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.


आज मौका मौका... आशिया चषकात भारत वि. पाकिस्तान लढत


 युएईमधील टी-20 आशिया चषकात आज भारत आणि पाकिस्तान  हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सामना आज रंगणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे.


पंतप्रधान मोदींची 'मन की बात'


 आज पंतप्रधान नरेंद्र मोदी  देशाला संबोधित करणार आहेत. मन की बातच्या माध्यमातून ते संवाद साधतील.   हा मन की बातचा 92 वा एपिसोड आहे. सकाळी 11 वाजता मन की बात कार्यक्रम होणार आहे. आजच्या मन की बातमध्ये पंतप्रधान काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. 


आज नोयडातील ट्विन टॉवर  होणार जमीनदोस्त


अवैध बांधकामामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नोयडातील ट्विन टॉवर आज पाडण्यात येणार आहेत. 13 वर्षांत उभे राहिलेले हे ट्विन टॉवर्स तब्बल 3700 किलो स्फोटकांच्या साहाय्यानं अवघ्या 12 सेकंदात जमीनदोस्त करण्यात येतील.  दोन्ही टॉवरमध्ये मिळून 915 फ्लॅट्स होते जे रिकामे करण्यात आलेत. या टॉवरच्या 500 मीटर अंतरावरील 1396 फ्लॅट्सही आज सकाळपर्यंत रिकामे करण्यात येतील.


पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस


पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. मोदींच्या हस्ते भुज कच्छ येथील स्मृति वन स्मारकाचं उद्घाटन होणार आहे. श्यामजी कृष्ण वर्मा यूनिवर्सिटीत होणाऱ्या कार्यक्रमात मोदी सामील होणार आहे. 


विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर


 विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते  समर्थ रामदासांचे जन्मस्थान असलेल्या जांब समर्थ येथे भेट देऊन श्रीराम मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटनेचा आढावा घेणार आहेत. तसेच, ते ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत, माजी मंत्री राजेश टोपेही जांब समर्थला भेट देणार आहेत