मुंबई : भाजपने राष्ट्रपतीपदासाठी दलित चेहरा देऊन मास्टर स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला असला, तरी शिवसेना मात्र रामनाथ कोविंद यांच्या नावावर प्रचंड नाराज आहे. फक्त दलितांच्या मतावर डोळा ठेवून भाजपनं कोविंद यांच्या नावाची घोषणा केली असून, मतांसाठी हे राजकारण चुकीचं आहे, असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडलं आहे.


“केवळ मतं डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार देणं, हे मोदींचं राजकारण आहे. मतांसाठी राष्ट्रपतीपदाचं राजकारण करणं, हे शिवसेनेला मंजूर नाही.”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राष्ट्रपतीपदाच्या पाठिंब्याबद्दल उद्या नेत्यांची बैठक होणार आणि त्यानंतर निर्णय जाहीर करणार असल्याचंही यावेळी उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेनेच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त आज षणमुखानंद सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी मध्यावधी निवडणुकांवरुनही भाजपवर निशाणा साधला.

मध्यावधीवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“मध्यवधीसाठी शिवसैनिक वणव्यासारखा पेटून उठेल. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्या, तुमच्या छाताडावर भगवा फडकवू.”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.