जालना : संभाजी भिडे यांच्या उलट-सुलट बोलण्यामुळे अस्थिरता निर्माण होते आहे. त्यामुळे भिडेंच्या सभांना बंदी घातली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. भिडेंच्या सभांना बंदी घालण्याची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं देखील आठवलेंनी म्हटलं आहे. आठवले यांनी आज जालन्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काल संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये बोलताना, माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने अपत्य नसलेल्या दाम्पत्यांना अपत्य प्राप्ती होते,असं वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आज आठवले यांनी भिडेंच्या या वक्तव्याचा समाचार घेत अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या भिडेंच्या सभांवर बंदी घालण्याची मागणी केली.

यूपीएससीतील नवीन बदलांबाबत आठवलेंना काहीच माहिती नाही!

यूपीएससी परीक्षा न देताही प्रशासकीय अधिकारी होण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे विविध सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये मोठ्या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशासकीय कामात योगदान देता येणार आहे. मात्र मोदी सरकारमधील मंत्री या निर्णयाच्या माहितीपासून अनभिज्ञ असल्याचं दिसत आहे. कारण आज जालन्यात असलेल्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंना UPSC तील नवीन बदलासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांची या निर्णयासंदर्भातील अनभिज्ञता समोर आली. पत्रकारांच्या या प्रश्नाचं उत्तर न देता आल्यानं आठवलेंनी अखेर आपण याची माहिती घेऊन नंतर उत्तर देऊ अशी भूमिका घेत सारवासारव केली.

संबंधित बातमी :

माझ्या बागेतील आंबे खाऊन अनेकांना मुलं झाली : संभाजी भिडे