मुंबई : राज्यात विरोधी पक्षाकडून सतत सत्ताबदलाच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतात. यात आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. नागपुरात बोलताना ते म्हणाले की, अजूनही काही बिघडलेले नाही. अडीच अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद आजही होऊ शकतं. आमची इच्छा आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) विचार करावा, असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. हे फडणवीसांना मान्य आहे, असंही ते म्हणाले.
यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, अजित पवार म्हणतात की कोण लाल आहे जो हे सरकार पाडून दाखवेल, तर मी म्हणतो तो लाल अजित पवारच आहेत, असा टोलाही आठवले यांनी लगावला.
आठवले म्हणाले की, हे सरकार दलित विरोधी हा आमचा आरोप आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर असे सरकार आले नसते. त्यांच्या विचारांच्या विरोधात हे सरकार आहे, असं ते म्हणाले.
त्यांनी म्हटलं की, मराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारने कोर्टात योग्य मांडला नाही. उद्धव ठाकरे सरकारला ते करता आले नाही. 50 टक्केच्या वर आरक्षण नेता येते अशी आमची भूमिका आहे. काल माझी आणि फडणवीस यांची भेट झाली. पदोन्नतीतलं आरक्षण नाकारायचा अत्यंत घातकी निर्णय अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आहे, असं ते म्हणाले.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, 20 तारखेनंतर आम्ही सर्व महायुतीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहोत. मराठा आरक्षण, पदोन्नतीतलं एस एसटी आरक्षण असे मुद्दे घेऊन ही भेट होणार आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस वेळ घेणार आहेत. देशभरातील क्षत्रियांना 10 ते 12 टक्के आरक्षण द्यावे, असंही ते म्हणाले.
नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, राज्यात सगळीकडे बाळासाहेबांचे नाव देण्यात येत आहे, ते द्यावे. पण नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटलांचेच नाव द्यावे ही आमची भूमिका आहे.