बारामती : शरद पवारांनी एनडीएमध्ये प्रवेश केला, तर नरेंद्र मोदी त्यांचा राष्ट्रपतीपदासाठी विचार करतील, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. एका कार्यक्रमासाठी रामदास आठवले बारामतीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
विरोधकांकडून राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांचं नाव घेतलं जात असलं, तरी ते निवडणूक लढवणार नाहीत. मात्र, त्यांनी जर एनडीएत प्रवेश केला तर नरेंद्र मोदी त्यांचा राष्ट्रपतीपदासाठी विचार करतील, असे रामदास आठवले म्हणाले.
शिवसेनेने जरी सरकारचा पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही. सध्या सरकारकडे बहुमत असल्यामुळं मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, असं सांगत रामदास आठवले यांनी मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाकारली.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला आरपीआयचा पाठिंबा असून त्या दृष्टीने सरकार पावलं टाकत असल्याचं आठवले यांनी सांगितले. विरोधकांनी कर्जमाफीसाठी रक्कम उभारण्याबाबत शासनाला सूचवावं असंही त्यांनी यावेळी म्हटलं.