बेळगाव : शिवसेनेचे मंत्री उद्या (गुरुवारी) बेळगावात जाऊन 'जय महाराष्ट्र'च्या घोषणा देणार आहेत.


'जय महाराष्ट्र' म्हटल्यास पद रद्द करण्याचा अजब फतवा, कर्नाटकचे नगर विकासमंत्री रोशन बेग यांनी दिला. त्यानंतर महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्या मराठी परिपत्रकासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चात शिवसेनेचे दोन मंत्री सहभागी होणार आहेत.

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते आणि आरोग्य मंत्री कर्नाटक संपर्कप्रमुख दीपक सावंत हे दोन मंत्री मोर्चात सहभागी होऊन, जय महाराष्ट्रच्या घोषणा देणार आहेत.

गुरुवारी  दुपारी 12 वाजता संभाजी चौकातून हा मोर्चा सुरु होणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाननंतर दीवाकर रावते आणि दीपक सावंत हे दोघे जण मोर्चात सहभगी होऊन बेळगावात जय महराष्ट्रचा एल्गार करणार आहेत.

काय आहे प्रकरण?

कर्नाटकात बेळगावसह सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी लोकप्रतिनिधींची गळचेपी सुरु आहे. लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्र बोलल्यास किंवा कर्नाटकविरोधात घोषणा दिल्यास पद रद्द करण्याचा इशारा नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी सोमवारी दिला होता.

बेळगाव दौऱ्यावर आलेल्या रोशन बेग यांनी ही माहिती पत्रकारांना दिली होती.

आगामी अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रमात, सभागृहात ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास किंवा कर्नाटक राज्यविरोधी घोषणा दिल्यास त्याचं पद रद्द करणार, असा नवीन कायदा कर्नाटक सरकार अंमलात आणणार आहे. बेळगाव महापालिका सभागृहात याबाबत मंगळवारी बैठक घेणार असल्याचंही रोशन बेग यांनी स्पष्ट केलं होतं.

एकीकडे अल्पसंख्यांक घटनात्मक अधिकार देण्यास टाळाटाळ सुरु असताना, एकीकरण समितीच्या लोकप्रतिनिधींची अशीही गळचेपी होणार आहे. त्यामुळे आता मराठी प्रेम तसंच महाराष्ट्र प्रेम दाखवणं लोकप्रतिनिधींच्या अंगलट येणार आहे.

शिवसेना-मनसेचं चोख उत्तर

कर्नाटकच्या नगर विकासमंत्री रोशन बेग यांना शिवसेनेनं चोख प्रत्युत्तर दिलं. कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकात येणाऱ्या कर्नाटक राज्याच्या बसगाड्यांवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून त्या बस कर्नाटकात परत पाठवल्या आहेत. जय महाराष्ट्रचे स्टिकर कर्नाटक परिवहनच्या बसवर लावल्यानं पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या 

अरेरावीची भाषा खपवून घेणार नाही, चंद्रकांत पाटलांचा रोशन बेगना सज्जड दम 

शिवसेना आक्रमक, कर्नाटकच्या बसवर 'जय महाराष्ट्र'चे स्टिकर्स 

‘जय महाराष्ट्र’ बोलल्यास पद रद्द, बेळगावात मराठी लोकप्रतिनिधींची गळचेपी