बारामती : दलित ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकरांसोबत एकत्र येण्याची तयारी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दर्शवली आहे. ते बारामतीत बोलत होते. यावेळी त्यांनी संभाजी भिडेंच्या भाषणांवर बंदी आणण्याचीही मागणी केली.

...तर दोन पावले मागे येईन : आठवले

“प्रकाश आंबेडकर हे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. प्रकाश आंबेडकर यांची तयारी असेल, तर मी दोन पावलं मागे घेण्यास तयार आहे”, असे रामदास आठवले बारामतीत म्हणाले. भारिप आणि आरपीआय युतीबाबत बोलताना त्यांनी हे मत मांडले.

संभाजी भिडेंच्या भाषणांवर बंदी आणावी

संभाजी भिडे हे गेल्या अनेक दिवसात वेगवेगळी बेताल वक्तव्य करत आहेत. यापूर्वी आम्ही दलित पँथरमध्ये असताना आम्हाला कारवाईला सामोर जावं लागलं. त्यामुळे संभाजी भिडे यांच्या सभांवर बंदी घालावी, अशी मागणी आठवले यांनी केली.

ॲट्रॉसिटी कायद्यावर काय म्हणाले आठवले?

दलितांना पुढे करुन मराठा समाजातील काही लोक स्वार्थासाठी ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करतात, असा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. तसेच, या कायद्याचा गैरवापर होऊ नये यासाठी काही बदल केले जाणार असल्याची माहितीही आठवले यांनी दिली.