जळगाव: आजपर्यंत आपण पुस्तक रेडिओ आणि टीव्हीच्या माध्यमातून रामायण वाचले किंवा पाहिले असेल. मात्र रंगीत रांगोळ्यांच्या माध्यमातून रामायण सादर करण्याचा अनोखा प्रयोग जळगावमध्ये करण्यात आला आहे.
खुशी रांगोळी मित्र परिवार आणि शांताबाई बहुद्देशीय शैक्षणिक संस्था यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हा अनोखा प्रयोग साकारण्यात आला आहे. अमरावतीचे रांगोळीकार अविनाश बावणे, मालेगावचे प्रमोद आर्वीकर आणि अमळनेरचे नितीन भदाणे यांनी या रांगोळीच्या कलाकृती सादर केल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात वाणी मंगल कार्यालय या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून नागरिकांसाठी हे अनोखे सादरीकरण खुले ठेवण्यात आले असून, रामायणाच्या या अनोख्या रुपाला नागरिकांकडूनही दाद मिळत आहे.