बीड/औरंगाबाद : अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर टीका करणारे पशुसंवर्धन मंत्री आणि रासपचे नेते महादेव जानकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. औरंगाबादमध्ये महादेव जानकरांच्या पुतळ्याची गाढवावरुन प्रतिकात्मक धिंड काढण्यात आली. जोडेमारो आंदोलनानंतर जानकरांच्या पुतळ्याचही दहन करण्यात आलं. ठाण्यातही राष्ट्रवादीने महादेव जानकरांविरोधात जोरदार आंदोलन छेडलं आहे. आमदार जितेंद्र आव्हाड आणि माजी खासदार आनंद परांजपेंच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. जानकरांच्या फोटोला जोडे मारुन त्यांचे फोटो जाळण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि ओबीसी समाजाचे नेते विजय चौघुले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला.
तर बारामतीमध्ये रासपचे माजी शहराध्य किशोर मिसाळ यांच्या घर आणि गाडीवर दगडफेक करण्यात आली. तसंच साताऱ्यातील पोवई नाक्यावरही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.
'बारामतीचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही' दसरा मेळाव्याला भगवानगडावर काल भाषण करताना रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी अजित पवारांवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. "बारामतीची वाट लावणार आहे. बारामतीची सुपारी घेणाऱ्यांची वाट लावणार आहे. बारामतीचं वाटोळे केल्याशिवाय शांत बसणार नाही," असा घणाघात जानकरांनी अजित पवारांवर केला.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस महादेव जानकरांविरोधात आक्रमक झाली आहे. राज्यभर ठिकठिकाणी जानकरांविरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची आंदोलनं सुरु आहेत.
शरद पवारांच्या फोटोवर शाईफेकीचा प्रयत्न दरम्यान, बारामतीमध्ये आज शरद पवार यांच्या विद्या प्रतिष्ठानच्या संस्थेच्या हॉस्टेलमध्ये घुसून, तीन ते चार तरुणांनी शरद पवार यांच्या फोटोवर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. या शाईफेक प्रकरणाला भगवानगडावरील महादेव जानकर यांच्या भाषणाची किनार आहे.