Rama Navami 2021 : आज चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी... देशभरात हा राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या राम नवमीच्या उत्सवावरही कोरोनाचं सावट आहे. देशभरात कोरोनाच्या सावटात यंदाचा राम नवमी उत्सव साजरा केला जाणार आहे. देशासह राज्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. दररोज कोरोनाबाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठत आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात अनेक कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. अशातच आज साजऱ्या केल्या जाणाऱ्या राम नवमी उत्सवासाठीही शासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमांचं पालन करत कोरोनाच्या सावटात राज्यभरात ठिकठिकाणी राम नवमीचा उत्सव पार पडत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील जनतेला श्रीरामानवमी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. "प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यांच्या जीवनातून जगण्याचा आदर्श निर्माण केला. धैर्य, शौर्य, स्नेह, त्याग, संयम, कर्तव्यनिष्ठेचं महत्व दाखवून दिलं. प्रभू श्रीरामचंद्र मर्यादापुरुषोत्तम होते. श्रीरामभक्ती आणि श्रीरामकथा देशवासियांसाठी जगण्याची ताकद आहे. श्रीरामभक्तीच्या सांस्कृतिक धाग्यानं आपण सारे जोडले गेलो आहोत. श्रीरामभक्तीचं आध्यात्मिक, सांस्कृतिक वैभव जपत असताना प्रभू श्रीरामचंद्रांनी दाखवलेल्या सत्याच्या, लोककल्याणाच्या मार्गावरुन चालण्याचा सर्वांनी प्रयत्न करुया. श्रीरामनवमीनिमित्त प्रभू श्रीरामांना भावपूर्ण वंदन. श्रीरामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा", असं म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
शिर्डीत रामनवमीच्या दिवशी शुकशुकाट, साई मंदिर दर्शनासाठी बंद, मात्र उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई
आजपासून शिर्डीच्या साई मंदिरात 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांसाठी साई मंदिर दर्शनाला बंद करण्यात आले आहे. त्यामुळे साईनगरित शुकशुकाट पाहायला मिळत आहे. यावर्षीचा रामनवमी उत्सव भक्तांविना साजरा होणार आहे. मात्र रामनवमी उत्सवानिमित्त साईबाबा संस्थानाच्या वतीनं साई मंदिर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
विठुरायाच्या गाभाऱ्यात फळा-फुलांचा बहर, रामनवमीनिमित्त आकर्षक सजावट
आज चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी निमित्त विठुरायाच्या मंदिराला रंगीबेरगी फुले आणि फळांची रंगसंगती साधत आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोरोणाच्या संकटामुळे सध्या विठुराया कुलूपबंद असला तरी मंदिरातील वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरा मात्र नियमितपणे सुरु आहेत. गंगाखेड येथील भाविक गोविंदराव तांदळे यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे. झेंडू, जरबेरा, गुलछडी या फुलांसह अननसाचा वापर कल्पकतेने या सजावटीत करण्यात आला आहे. विठ्ठल रुक्मिणी गाभारा, सोळखंबी, चौखंबी येथे केलेल्या सजावटीमध्ये विठुरायाचे मंदिर खुलून उठले आहे.
नाशकात अतिप्राचीन काळाराम मंदिरात भाविकांविना रामनवमीचा सोहळा
नाशिकच्या अतिप्राचीन काळाराम मंदिरात सलग दुसऱ्या वर्षी राम जन्मत्सोव भक्ताविना साजरा होणार आहे. दरवर्षी हजारो भाविक हा जन्मसोहळा आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी मंदिरात उपस्थित असतात. मात्र कोरोनाच्या सावटामुळे भविकाना यंदाही परवानगी नाकारण्यात आली आहे. मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. मंदिरातील निवडक पुजाऱ्यांच्या हस्ते पहाटेपासूनच महाभिषेक पूजन आणि इतर धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. विद्युत रोषणाई आणि आकर्षक फुलांच्या सजवटीने मंदिर सजविण्यात आलं आहे. श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्तींना देखील साजशृंगार करण्यात आला आहे. दुपारी 12 वाजता यंदाचे मानकरी विलास बुवा पुजारी यांच्या हस्ते श्रीरामजन्म सोहळा होणार आहे.
पोहरादेवीत रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
वाशिमच्या पोहरादेवी येथे रामनवमी निमित्त यात्रेचं आयोजन केलं जातं, दरवर्षी लाखोंच्या संख्येनं इथं बंजारा भाविक नतमस्तक होण्यासाठी दाखल होत असतात. मागितलेला नवस फेडतात, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. त्यामुळे पोहरादेवी येथे मंदिर परिसर आणि धर्मपीठावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. संत सेवालाल महाराज आणि जगदंबादेवीची पूजा अर्चा घरी करावी आणि पोहरदेवीला गर्दी न करण्याचं आवाहन महंतांनी केलं आहे.
भक्ताविना रामनवमी......!, शेगाव येथील मंदिरात शुकशुकाट
आज रामनवमी. दरवर्षी शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात राम नवमी साजरी करण्यासाठी दोन ते अडीच लाख भाविक येत असतात, पण यावार्षिही मंदिर बंदच असल्याने आता भक्तांविना रामनवमी होत आहे. मंदिर बंद असल्याने मंदिराच्या आत फक्त मोजक्याच, 4 ते 5 भाविकांच्या उपस्थितीत रामनवमी साजरी केली जाणार आहे. दरवर्षी ज्याठिकाणी भल्या मोठ्या रांगा भाविकांच्या बघायला मिळतात, त्याठिकाणी आता शुकशुकाट आहे.