नवी दिल्ली : प्रदीर्घ चर्चेनंतर बहुचर्चित मोटर वाहन दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत मंजूर करण्यात आलं आहे. रस्ते अपघात रोखण्यावर या विधेयकात भर देण्यात आला आहे. तसेच वाहुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी दडांच्या रकमेतही मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे वाहतुकीचे नियम मोडणे चांगलेच महागात पडणार आहे.


केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत हे विधेयक मांडले. या विधेयकात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यास आता दहा हजार रुपये दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच हिट अँड रन केसमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबीयांना दोन लाखांची भरपाई देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास दहापट दंड आकारण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे.


नवीन विधेयकानूसार परवान्याशिवाय गाडी चालवल्यास 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे परवान्याशिवाय गाडी चालवणाऱ्यांना चाप बसले अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्यांना आतापर्यंत 100 रुपये दंड आकारण्यात येत होता. या विधेयकात ही दंडाची रक्कम एक हजार रुपये करण्यात आली आहे. शिवाय वाहनचालकाचं लायसन्सही तीन महिन्यांसाठी जप्त करण्यात येणार आहे. तसेच गाडी चालवताना फोनवर बोलणाऱ्यांनाही 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.