सोलापूर: संभाजीराजेंचे काय होणार? राजे काय करणार आहेत? राजे माघार घेणार की काय? असा सवाल सर्वत्र विचारला जात असताना मात्र या सगळ्यामुळे आपल्या घरात तणावाचे वातावरण नसल्याचं संभाजीराजे यांचे पुत्र युवराज कुमार शहाजीराजे यांनी सांगितलं. आमचे रुटीन लाईफ सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सोलापुरात संभाजी आरामार संघटनेच्या कार्यक्रमास युवराजकुमार शहाजीराजे यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते.
संभाजीराजे यांच्या राजकीय घडामोडीबाबत मुलगा म्हणून शहाजीराजेंच्या भावना काय आहेत असा प्रश्न माध्यमांनी त्यांना विचारला. त्यावर युवराजकुमार शहाजीराजे म्हणाले की, "काल रात्रीदेखील मी आणि आई (संभाजीराजे यांच्या पत्नी) घरात काय साहित्य खरेदी करावे यावर चर्चा करत होतो. आम्ही कोणत्याही प्रकारच्या तणावात नाही, आमचे रुटीन लाईफ सुरू आहे. मात्र या सगळ्या घडामोडीवरुन लक्षात येतय की संभाजीराजेंबद्दल जनतेच्या मनात किती प्रेम आहे. राजकारणाचे टेंशन रोजच्या जीवनात आणणे हे मला पटत नाही. आम्ही जर खूश नसलो तर लोकांसाठी कसे काम करु?"
राजकीय घडामोडीबाबत थेट बोलण्यास मात्र युवराजकुमार शहाजीराजे यांनी नकार दिला.
संभाजीराजे उद्या भूमिका जाहीर करणार
या सर्व घडामोडींनंतर संभाजीराजेंनी राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी चर्चा करुन आपली भूमिका जाहीर करु असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून संभाजीराजे विविध लोकांशी चर्चा करत असल्याची माहिती आहे. आता संभाजीराजे छत्रपती नेमकी काय भूमिका घेणार, ते निवडणूक लढणार की माघार घेणार हे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे.
मनसेचा संभाजीराजेंना पाठिंबा
छत्रपती संभाजीराजेंना मनसेने पाठिंबा दिला आहे. याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी यामध्ये राजकारण आणायचं नसल्याचं सांगितलं. आमदार राजू पाटील म्हणाले की, "संभाजीराजेंची चांगल्या भावनेने भेट घेतली असून त्यांना मतदान करणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. इतके दिवस पक्षात या तर मत देवू, हे जे काही सुरू आहे ते चुकीचं आहे, सर्वांनी मतदान करून राजेंना पाठिंबा दिला पाहिजे."