मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात पुन्हा सत्ता संपादन करण्यासाठी उद्यापासून 'महाजनादेश यात्रा' काढत आहेत. या यात्रेसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु असताना विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांच्या या यात्रेला लक्ष्य करण्यास सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी या यात्रेच्या  निमित्ताने मुख्यमंत्र्यांना 11 प्रश्न विचारले आहेत.

राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने राज्यातील विविध समस्यांशी संबंधित प्रश्न विचारले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जर मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर आम्हाला लोकांमध्ये हे प्रश्न घेऊन जावे लागतील, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.

काय आहेत राजू शेट्टींचे प्रश्न?

प्रश्न 1 - गेल्या महिन्यात पुण्यात बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्या मजुरांचा मृत्यू झाला होता. अशा मजुरांसाठी जे बांधकाम कल्याण मंडळ स्थापन करण्यात आलंय त्या मंडळाकडे दहा हजार कोटी रुपये जमा आहेत. त्याचा उपयोग करण्यासाठी जी टेंडर काढण्यात आली ती कलंकितांना देण्यात आली आहेत. लातूर, अमरावती, गोंदिया अशा ठिकाणी हजारो बोगस कामगार दाखवण्यात आलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाने हे चालू आहे.

प्रश्न 2 - पिक विम्याच्या संदर्भात लुट होत असल्याच आम्ही दोन दिवसांपूर्वीच दाखवून दिले होते. त्यामधे रिलायन्सचा देखील समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी त्यावर कारवाई केली नाही. मराठवाड्यात दुष्काळ असताना विमा कंपन्यांना फायदा कसा झाला याचा उत्तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या यात्रेत द्यावं.

प्रश्न 3- कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांचा कृषी उत्पादनाचा खर्च कमी करुन शेतकऱ्यांचं नुकसान केलं. त्याचं उत्तर द्यावं.

प्रश्न 4- सुभाष देशमुख, नितीन गडकरी, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. त्यांच्यावर कारवाई करणार का?

प्रश्न 5- धनगर समाजाकडून आदिवासी आरक्षणासाठी बारामतीला आंदोलन सुरू होतं. तेव्हा भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष या नात्याने आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमधे आरक्षण देऊ, असं म्हटलं होतं. पण कार्यकाळ संपत आला तरी आरक्षण दिलेलं नाही आणि सवलतीच्या नावाने बोळवण का केली जातीय?

प्रश्न 6 - लिंगायत समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देऊ असं मुख्यमंत्री म्हणालेत. पण लिंगायतांमधे आधीच बारा बलुतेदारांचा समावेश होता. साळी, माळी, गवळी, कुंभार, परिट, गुरव, जंगम, सुतार, कोष्टी अशा अनेक लिंगायत जाती ओबीसी मध्ये आहेत. मग त्यांना आणखी आरक्षण कसं देणार? त्यांना वेगळा धर्म म्हणून मान्यता द्यावी.

प्रश्न 7- आघाडी सरकारमधे साखर कारखान्यांमध्ये आणि सिंचनामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला होता. सरकार आल्यावर मात्र कारवाई झाली नाही. ती का झाली नाही? आणि ती केव्हा होणार ?

प्रश्न 8- शेतकऱ्यांना कापसाचे बोगस बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याऐवजी शेतकऱ्यांनाच तुरुंगात टाकण्याची भाषा का ?

प्रश्न 9- सुशिक्षित बेरोजगारांना न्याय देण्यासाठी 35 लाखांची मेगा भरती करणार होतात. ती का केली नाही?

प्रश्न 10- राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या कामगारांना संपूर्ण पगार हातात पडत नाही. कंत्राटदार किंवा कंत्राट घेतलेली कंपनी मधल्यामधे डल्ला मारते. या कंत्राटी कामगारांना न्याय कधी देणार?

प्रश्न 11- गेल्या चार वर्षांपासून नवीन वीज पंपाच्या जोडण्या शेतकऱ्यांना दिलेल्या नाहीत. शेतकऱ्यांना एक रुपया 16 पैसे प्रती युनिट दराने विज देणार म्हटलं होतं पण प्रत्यक्षात दोन रुपये पन्नास पैसे दराने वीज दिली असं का?

या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न दिल्यास आम्ही आंदोलन करु, असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला आहे.