पुणे : राज्यात मान्सून वेगाने दाखल होईल. 2, 3 आणि 4 जून रोजी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज कृषी हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. शिवाय यावर्षी राज्यात सरासरीच्या 102 टक्के पाऊस होईल, असंही साबळे यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांसाठी हा उत्तम हंगाम आहे. राज्यात 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर पेरणी करावी, असा सल्ला साबळे यांनी दिला आहे. कमी दिवसात जास्त पाऊस पडणार आहे. मात्र काही काळ पावसाचा खंडही असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान मान्सून केरळमध्ये 30 मेपर्यंत दाखल होईल, असं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. मात्र राज्यात मान्सून कधीपर्यंत दाखल होईल, याबाबत अजून काहीही माहिती देण्यात आलेली नाही.
मान्सून राज्यात दाखल झाल्यानंतर उन्हाने त्रस्त झालेल्या लोकांना आणि बळीराजालाही यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. बंगालच्या उपसागरात निर्णाण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून वारे वेगानं सरकत आहेत.