Swabhimani Shetkari Sanghatana : ऊस दरासाठी निर्णायक ठरणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची (Swabhimani Shetkari Sanghatana) 21 वी ऊस परिषद आज होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद होणार आहे. आज दुपारी एक वाजता या परिषदेला सुरुवात होणार असून, सायंकाळी पाच वाजेपर्यंत या परिषदेची सांगता होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये ही परिषद होणार असून, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन राजू शेट्टींनी केलं आहे.
आजच्या ऊस परिषदेत 'या' मुद्यावर होणार चर्चा, राजू शेट्टींची एबीपी माझाला माहिती
आजच्या ऊस परिषदेत तीन मुद्यावर चर्चा होणार आहे. मागील वर्षी गेलेल्या ऊसाला FRP च्या वर अधिकचे 200 रुपये मिळायला हवेत. कारण बाजारपेठेत साखरेच्या दरात वाढ झाली आहे. तसेच निर्यात केलेल्या साखरेला चांगला दर मिळाला असल्याची माहिती राजू शेट्टींनी एबीपी माझाशी बोलताना दिली. तसेच दुसरा मद्दा यावर्षी FRP किती घ्यायची या संदर्भातील आहे. FRP च्या वर किती दर घ्यायचा यावर चर्चा होणार असल्याची माहिती राजू शेट्टींनी दिली. तसेच तिसरा मुद्दा म्हणजे करखानदारांकडून होणारी काटामारी. कारखान्यावरील काटे हे नवीन तंत्रज्ञानाचा वापर केलेले असावेत असे राजू शेट्टी म्हणाले.
सध्या खतांचे तसेच मजुरीचे वाढलेले दर, साखर कारखान्यांना झालेला नफा लक्षात घेऊन एफआरपीची रक्कम अधिक मिळावी, अशी या परिषदेत आमची मागणी राहणार असल्याचे राजू शेट्टींनी मागेच सांगितले होते. एफआरपीची रक्कम वाढवून मिळावी यासाठी 9 ठिकाणी 'जागर एफआरपीचा' हे अभियान देखील राजू शेट्टींनी घेतले होते. याबाबत शेतकऱ्यांना जागरूक करण्याचे काम या माध्यमातून त्यांनी केलं होते. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 24 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरपर्यंत 9 दिवस ही जागर यात्रा निघाली होती. त्यानंतर आज जयसिंगपूरमध्ये ऊस परिषद होमार आहे. या ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर सगळी तयार पूर्ण झाली आहे.
अजितदादांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सल्ला देण्याचा नैतिक अधिकार आहे का?
या ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. गेल्या अनेक दिवसापासून अजित पवार हे शेतकऱ्यांना सल्ला देतात की, ज्यादा पैसे देण्याऱ्या, एकरकमी पैसे देण्याऱ्या कारखान्यांनाच ऊस द्या. पण दादा तुम्हीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेऊन एकरकमी FRP चे दोन तुकडे करण्याचा कायदा विधानसभेत मंजूर करुन घेतला. त्यामुळ तुम्हाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना असा सल्ला देण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा सवाल शेट्टी यांनी केला. राजकारणासाठी शेतकऱ्यांचा वापर जरुर करा, पण तुमच्या राजकारणात शेतकऱ्यांचा बळी देऊ नका असेही शेट्टी यावेळी म्हणाले.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या साखरेची मागणी वाढल्याने मोठ्या प्रमाणात साखर निर्यात झाली आहे. तसेच इथेनॉल आणि कच्च्या साखरेचे दरही अधिक आहेत. ब्राझिलमध्ये यंदा उसाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे पुढील वर्षात भारताच्या साखरेला जागतिक बाजारात चांगली मागणी असेल. सर्व पाहता साखर कारखान्यांना वाढीव एफआरपी देणे शक्य आहे. तसेच कारखाने जी उपउत्पादने बनवतात, त्याचीची रक्कम शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक असल्याचे शेट्टी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: