नाशिक : शेतकरी आंदोलन सुकाणू समितीत फूट उभी फूट पडल्याचं चित्र आहे. आज मुंबईत होणाऱ्या बैठकीत अनेक सदस्य गैरहजर राहणार आहेत. त्यामुळे सुकाणू समितीच्या माध्यमातून सुरु असलेली चर्चा थंडावेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.


आज मुंबईमध्ये सुकाणू समितीची समन्वय समितीशी बैठक होणार आहे. या बैठकीला डॉ.गिरधर पाटील, रामचंद्रबापू पाटील, अनिल घनवट, बुधाजीराव मुळिक आदी सदस्य अनुपस्थित राहणार आहेत. गिरधर पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना हे स्पष्ट केलं आहे.

सर्व सदस्यांना विश्वासात न घेता बैठका, चर्चा सुरू असल्याचा आरोपही गिरधर पाटील यांनी केला आहे. तसंच आज होणाऱ्या बैठकीचा निरोपही पोहचले नाही असा आक्षेपही नोंदवला आहे. सरकारशी बोलण्याची आम्हाला कुठलीही घाई नाही. आधी शेतकऱ्यांवरचे दाखल गुन्हे मागे घ्या, मगच चर्चा करा असा पवित्रा गिरीधर पाटील यांनी घेतला आहे. सरकारशी चर्चेचा राजकीय थिल्लरपणा थांबवण्यासही गिरधर पाटील यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सरकारसोबतच्या चर्चेआधीच सुकाणू समितीमध्ये उभी फूट पडल्याचं चित्र समोर आलं आहे.

गिरधर पाटील काय म्हणाले?

सर्वसमावेशक सुकाणू समिती नेमावी, असा आग्रह मी पूर्वीपासून धरल्याचं गिरधर पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

सुकाणू समितीचे निमंत्रक राजू देसलेंकडून आरोपांवर उत्तर

डॉ. गिरधर पाटील खोट बोलत आहेत. आजच्या बैठकीसाठी आम्ही सगळ्यांना स्वतः फोन केले आहेत, निमंत्रण दिलं आहे असं सांगत सुकाणू समितीचे निमंत्रक राजू देसले यांनी गिरधर पाटलांवर पलटवार केला आहे.