Raju Shetti : महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांचे 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, ते आता पाळायला तयार नाहीत. शेत मजुरापेक्षा देखील शेतकऱ्यांची बिकटअवस्था आहे असा केंद्राचाच रिपोर्ट असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी व्यक्त केलं आहे. महायुतीच्या नेत्यांनी हमीभावावर 20 टक्के अनुदान देऊ सांगितलं होते. मात्र, तेही आश्वासन पूर्ण केलं नाही. सोयाबीन, कापूस, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे शेट्टी म्हणाले. शेतकऱ्यांचे जवळपास 15 हजार कोटींचे नुकसान झाल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच हमीभावावर 20 टक्के अनुदान देण्याची घोषणा देखील महायुतीच्या नेत्यांनी केली होती. मात्र, आता सरकार स्थापन होऊन पाच महिने पूर्ण झाले तरी अद्याप महायुती सरकारनं शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलेलं नाही. त्यामुळं शेतकरी आक्रम होताना दिसत आहेत. तसेच राजू शेट्टींनी देखील शेती प्रश्नावरुन आक्रमक भूमिका घेतलीय.
अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं नुकसान
सरकारने 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिले होते. आश्वासन पूर्ण करता येत नव्हतं तर दिलं का? असा सवाल देखील शेट्टी यांनी केला. अवकाळी पावसाचे थैमान आहे, भांडवली शेतीचं नुकसान झाल्याचे शेट्टी म्हणाले. भाजीपाला, फळांचे नुकसान झाले, पंचनामे होत नसल्याचे शेट्टी म्हणाले. ठिबक सिंचनाचे अनुदान रखडले आहे. अशात शेतकऱ्यांनीच संघर्ष करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेट्टी म्हणाले.
शक्तीपीठ महामार्गामध्ये 50 हजार कोटींचा घोटाळा होणार, राजू शेट्टींचा निशाणा
शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता नाही. आधीच रत्नागिरी-नांदेड महामार्ग असताना समांतर रस्ता त्याला बनवल्यास आमचा विरोधच असेल असेही शेट्टी म्हणाले. ग्रामीण भागात जेव्हा मंत्री नेते फिरतील तेव्हा आम्ही जाब विचारु असेही शेट्टी म्हणाले. आम्ही गप्प आता बसणार नाही. शक्तीपीठ महामार्गामध्ये 50 हजार कोटींचा घोटाळा होणार असल्याचे शेट्टी म्हणाले. हा मार्ग बांधण्याचा विचार केला तर 800 किमीसाठी 30 ते 35 हजार कोटी खर्च होतो. मात्र, हा खर्च 86 हजार कोटींवर जात असल्याचे शेट्टी म्हणाले. सक्तीनं शेतकऱ्यांच्या जमिनी यात घेतल्या जाणार आहेत. सर्व राजकीय नेते लोकप्रतिनिधींचे हात ओले होणार आहेत. आम्ही हा रस्ता होऊ देणार नाही अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली.
महत्वाच्या बातम्या: