शिर्डी (अहमदनगर) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी संघर्ष यात्रेत सहभागी होऊन नेतृत्त्व करावं, असं आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. विखे पाटील यांनी शिर्डीत राज्यातील विविधा मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला.


“नारायण राणेंचं संघर्ष यात्रेबाबत विधान वस्तुस्थितीच्या उलट असून संघर्ष यात्रेमुळेच मुख्यमंत्र्यांनी संवाद यात्रा काढली आहे. राज्य सरकारवर दबाव वाढत चालला असून अनेक घोषणा सरकार आज करतंय हे संघर्ष यात्रेचच फलीत आहे. नारायण राणे यांनी हे वास्तव समजून घेण्याची आवश्यकता आहे.”, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

राज्य सरकार मुकबधीर झालं असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारला ऐकू येत नसून सरकारने डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. राज्य सरकार मुकबधीर झाले आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. शिवाय, शेतकऱ्यांचं सांत्वन होणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, सरकारने  कर्जमाफी करावी, अशी मागणीही विखे पाटील यांनी केली.

“समृद्धी महामार्ग मूठभर अधिकाऱ्यांसाठी असून यातून शेतकऱ्यांची समृद्धी होणार नाही. बंदुकीचा व कायद्याचा धाक दाखवून जर सरकार काम करणार असेल तर आम्ही गप्प  बसणार नाही.” असा इशारा विखे पाटलांनी सरकारला दिला.