मुंबई: तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी आदेशाची गरज नाही. सर्वत्र तूर खरेदी केंद्र सुरु आहेत, जरी शेतकऱ्यांना काही अडचण असेल, तर त्यांनी थेट मला फोन करा, मी स्वत: त्यांच्या शंकांचं निरसन करेन, असं आश्वासन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं. ते एबीपी माझाशी बोलत होते.


राज्यातल्या शेतकऱ्यांची तूर 31 मे पर्यंत खरेदी करण्याची परवानगी केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिली खरी. मात्र तूर खरेदीचा सरकारी आदेश राज्यातल्या बहुतांश बाजार समित्यांना मिळेलेलाच नाही, त्यामुळं अनेक बाजार समित्यांमध्ये तुरीची खरेदी अद्याप बंदच आहे.

वाशिममध्ये सकाळपासून शेतकरी 5 ते 6 ट्रक तूर घेऊन बाजार समितीबाहेर उभे आहेत, मात्र सरकारी आदेश न मिळाल्यानं तुरीची खरेदी होऊ शकलेली नाही.

यवतमाळ बाजार समितीतही हीच स्थिती पाहायला मिळतेय.

त्यामुळं सरकारचा हा आदेश फक्त घोषणेपुरताच आहे का असा प्रश्न आता शेतकऱ्याला पडू लागला.

त्यामुळेच एबीपी माझाने याबाबत पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

"शेतकऱ्यांनी हतबल होऊ नये. एखादं तूर खरेदी केंद्र बंद असेल, तर तिथल्या जिल्हाधिकारी किंवा उपनिबंधकाशी संपर्क साधा. ते शक्य नसेल तर थेट माझ्या फोन नंबरवर संपर्क साधा, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे", असं सुभाष देशमुख म्हणाले.

कालच मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या भेटीनंतर तूर खरेदीची मुदत वाढवल्याची घोषणा केली होती. त्यामुळं त्यांच्या घोषणेची अंमलबजावणी कधी होणार याकडे तूर उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.