सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मिरज तालुक्यामध्ये भाजपला झुगारून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेससोबत आघाडी केली. याच अनुशंगाने दोन्ही पक्षातील जागावाटपाबाबत खासदार राजू शेट्टी आणि पतंगराव कदम यांच्यात कदम यांच्या सांगलीतील 'अस्मिता' बंगल्यात गुप्त बैठक पार पडली.
आघाडीच्या माध्यमातून चार जिल्हा परिषद मतदार संघात आम्हला चांगले यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करत राजू शेट्टी यांनी एक दोन दिवसात आमचा जागावाटपाबाबत निर्णय होईल असे सांगितले.
कधीकाळी ऊस दराच्या आंदोलनासाठी राजू शेट्टी यांनी पतंगराव कदम यांच्या याच बंगल्यासमोर अनेक वेळा आंदोलने केली होती. याच बंगल्याला अनेक वेळा स्वा.शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानि घेराव देखील घातला होता. आज मात्र हीच संघटना याच बंगल्यात चहापान घेताना दिसली. यावर राजू शेट्टी यांनी देखील मार्मिक प्रतिक्रिया दिली. “आम्ही चळवळीतील कार्यकर्त आहोत. त्यावेळी पतंगराव कदम सत्ताधारी असल्याने न्याय मागणीसाठी आम्हाला रस्त्यावरची लढाई करावी लागत होती. पण आता नेमकं उलटं आहे. ते विरोधी पक्षात आहेत. आम्ही सत्तेच्या बाजूला आहोत. तरी सुद्धा कार्यकर्त्यानी निवडणून आणण्यासाठी अशा प्रकारच्या भेटी-गाठी घ्याव्याच लागतात”, असे राजू शेट्टी यांनी गमतीशीरपणे सांगितले.