उस्मानाबाद : राष्ट्रीय स्तरावर कौतुक व्हावं, असा वेगवान निकाल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंबच्या न्यायालयानं दिला आहे. टाटा सामाजिक संस्थेच्या मिझोराम-मणिपूर राज्यातल्या तीन मुली फील्ड वर्कसाठी कळंबला आल्या होत्या. तिथे एका तरुणानं त्यांचा विनयभंग केला. घटनेनंतर अवघ्या सहा दिवसात 9 साक्षीदार तापासत न्यायालयाने आरोपीला दोन वर्षाची सश्रम कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
टाटा सामाजिक संस्थेच्या बॅचलर ऑफ सोशल वर्कच्या मिझोराम आणि मणिपूरच्या तीन मुली फिल्ड वर्कसाठी कळंबला आल्या होत्या. 21 वर्षाच्या संतोष लिंकेने मुलींचा आधी रिक्षात विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. नंतर पाठलाग करत संतोष मुली मुक्कामी होत्या. त्या पर्याय संस्थेच्या परिसरात पोहचला.
विनयभंग झाल्यावर मुलींनी न घाबरता आरोपीला पकडलं. पोलिसांत घटनेची माहिती दिली. अवघ्या 12 तासात तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात चार्जशिट दाखल केली.
25 जानेवारीला घटना घडली. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालले. त्यानंतरच्या सहा दिवसात न्यायालयात 9 साक्षीदारांची साक्ष झाली. गुन्हेगारास 2 वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजाराचा दंड झाला.
इतका वेगवान निकाल आल्यानं टगेखोरांच्या त्रासाला वैतागलेल्या महाविद्यालयीन मुलींना मोठा आनंद झाला आहे.
कोपर्डी घटनेनंतर सरकारी व्यवस्थेवरचा अविश्वास आणि न्ययालयीन दिरंगाईमुळं महाराष्ट्रात आंदोलनं झाली. पण कळंबसारखे पटापट निकाल लागू लागले, तर महिला आणि मुलींमध्ये अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी मोठी हिंमत येईल, एवढं नक्की.