मुंबई: फोर्ब्स या नामांकित पत्रिकेच्या वेगवेगळ्या याद्यांची प्रतीक्षा अनेकांना असते. या यादीत आता  बुलढाण्यातील लोणार येथील एका युवकांनं स्थान मिळवलं आहे. राजू केंद्रे असं या युवकाचं नाव आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल फोर्ब्सनं घेतली असून यामध्ये राजू केंद्रेवर एक स्टोरी प्रकाशित करण्यात आली आहे.


राजू केंद्रे सध्या चेवनिंग स्कॉलरशिपवर SOAS- युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये डेव्हलपमेंट स्टडीज शिकतोय. 2022 च्या "Forbes 30 Under 30" यादीमध्ये त्याचा समावेश झाला आहे. 'फोर्ब्स' इंडिया फेब्रुवारीच्या अंकात सविस्तर यादी आणि स्टोरी पब्लिश झाली आहे. या आठवड्यातच.  यादी ऑनलाईनही उपलब्ध होईल. नक्कीच माझ्यासारख्या वंचित घटकातून येणाऱ्या व पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या युवकासाठी ही आनंदासोबत मोठ्या जबाबदारीची गोष्ट आहे असं राजू केंद्रेनं म्हटलं आहे.


राजूनं सांगितलं की, आज क्षमता असतानाही  संधीला मुकणारी अशी भरपूर लेकरं आपल्या आजूबाजूला तांड्यात, झोपडपट्टीत, वाड्यात, पाड्यात आहेत. म्हणून संघर्षाच आणि जमिनीवरच्या क्षमतेच प्रतीक असलेल्या 'एकलव्य'चं नाव घेऊन प्लॅटफॉर्म तयार करावा वाटला, हे नावही आपसूकच सुचलं. पुढच्या पिढीच्या ठेचा कमी व्हाव्यात; जागतिक कीर्तीच शिक्षण पहिल्या पिढीतील शिकणारे विद्यार्थी, बहुजन समाजातील युवक कसे घेऊन शकतील हीच त्यामागची मुख्य प्रेरणा-हेतू-उद्देश आहे असं राजू सांगतो. 


राजूला काही महिन्यांपूर्वीच चेवनिंग स्कॉलरशिप मिळाली आहे. यासाठी तो लंडनला गेला आहे. असं असलं तरी त्याचं काम मात्र सुरू आहे. "भारतातील उच्च शिक्षण आणि असमानता" यावर तो संशोधन करत आहे. आता डिग्री झाली की लगेच परत येऊन नव्या दमाने काम सुरू करायचं आहे. परत आल्यावर परत एकदा काही महिने ग्राऊंडवर पिंजून काढायचेत असं राजू म्हणाला.


'फोर्ब्स'चा हा पुरस्कार सावित्रीमाई, फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार, कर्मवीर अण्णा, भाऊसाहेब देशमुख, बिरसा मुंडा, जयपालसिंह मुंडा व सर्वच वंचित घटकासाठी आदर्श असलेल्या समाजसुधारकांना व त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्यास अर्पण करतोय असंही राजू केंद्रेने म्हटलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या: