बुलढाणा : आज 12 जानेवारी, राजमाता जिजाऊंचा जन्मदिन... यानिमित्ताने सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी म्हणजे राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यातील जन्मस्थळी आज सकाळी साडेपाच वाजता जिजाऊंच्या तेराव्या वंशाजानी महापूजन केलं. यावेळी कोरोनाचे निर्बंध असल्याने राजवाड्यात फक्त मोजक्याच 50 जणांनाच प्रवेश देण्यात आला. महापूजन झाल्यावर माता जिजाऊंना वंदना करण्यात आली. शासकीय पूजन झाल्यावर लगेचच राजवाडा कोरोनाचे निर्बंध असल्याने बंद करण्यात आला. 


बुलढाणा येथील सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ असलेल्या राजे लखुजी जाधव राजवाड्यात दरवर्षी 12 जानेवारीला जन्मोत्सव साजरा करण्यात येतो.  परंतु, यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने अटी आणि शर्तीचे पालन करुन जन्मोत्सव साजरा करण्यासाठी फक्त 50 जणांनाच परवानगी दिली आहे. 


राजमाता जिजाऊ जन्मोत्सवासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आरटीपीसीआर चाचणीच्या निगेटिव्ह अहवालासह लशीचे दोन्ही डोस घेतलेले प्रमाणपत्र सोबत असणे बंधनकारक केलं. यामुळे सलग तिसऱ्या वर्षीही कोरोनामुळे जिजाऊ जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला.


सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे कार्यक्रम साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातून लोक या उत्सवासाठी येत असतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जन्मोत्सवासाठी फक्त 50 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.  


राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग


सध्या राज्यातही कोरोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात मंगळवारी तब्बल  34 हजार 424 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 18 हजार 967 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात मंगळवारी नव्या 34 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 1281 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha